पाच कोटींचे बियाणे मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:01:10+5:30
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने यंदा कापसाच्या तुलनेत किमान ३० ते ३५ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. मात्र, पेरणीच्या सुरुवातीच्या काळातच काही कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेल्या काही लॉटचे बियाणे माथी मारल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला.

पाच कोटींचे बियाणे मातीमोल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उगवणशक्ती नसलेले वांझोटे बियाणे महाबीजसह इतर कंपन्यांनी माथी मारल्याने शेतकऱ्यांना २० हजार हेक्टरमध्ये किमान पाच कोटींचा फटका बसला आहे. पेरणीच्या काळात आरिष्ट ओढवल्याने तातडीने नुकसानभरपाई किंवा पर्यायी बियाणे देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
रोहिणीत मान्सूनपूर्व सरी व लगेच मृगधारा कोसळल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण पसरले होते. हवामान खात्यासह स्कायमेटनेदेखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला व जिल्ह्यासह विदर्भात मान्सून आल्याची सुखद वार्ता दिली. त्यामुळे पेरणीचा जोम वाढला. कमी पावसात, कमी दिवसांत येणारे कॅश क्राप या अर्थाने यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या ९३०५ या वाणाची पेरणी केली. यामध्ये बहुतांश क्षेत्रातील सोयाबीन उगवलेच नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने यंदा कापसाच्या तुलनेत किमान ३० ते ३५ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. मात्र, पेरणीच्या सुरुवातीच्या काळातच काही कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेल्या काही लॉटचे बियाणे माथी मारल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला. पाच कोटींचे बियाणे मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारीनंतर कृषी विभागाद्वारे क्षेत्रभेटी व तालुकास्तरीय समितीद्वारे पाहणी सुरू झालेली आहे. या प्रक्रियेनंतर कंपन्यांद्वारे बियाणे मिळणार की यासाठी ग्राहक मंच्याकडे दाद मागावी लागणार, हा प्रश्न कायम आहे.
महाबीजची ३० किलोची सोयाबीन बियाण्यांची बॅग ही २३४० रुपये या दराने विकली जाते. एका एकराला साधारणपणे एक बॅग बियाणे लागतेच. या अंदाजाने जिल्ह्यात सद्यस्थितीत १८ ते २० हजार बॅग बियाणे मातीमोल झाल्याने शेतकºयांचे साधारणपणे पाच कोटींचे नुकसान झाले आहे.
तालुका समितीच्या अहवालाकडे लक्ष
शेतकºयांच्या बियाण्यासंदर्भात तक्रारी असतात. त्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय कृषी अधिकारी अध्यक्ष व पंचायत समितीचे कृषी अधिकारी सदस्य सचिव असलेली सात सदस्यीय समिती असते. या समितीत कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांचे शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, विक्री केंद्राचा संचालक, तालुका कृषी अधिकारी व बियाणे कंपनीचा प्रतिनिधी असतो. या समितीद्वारे शेतकऱ्यांच्या तक्रारीची शहानिशा करण्यात येते. यामध्ये बियाणे सदोष असल्यास तडजोड किंवा कंपन्या दाद देत नसल्यास शेतकऱ्यांना ग्राहक मंचाचा पर्याय उपलब्ध आहे.
उगवण न होण्याची प्रामुख्याने तीन कारणे आहेत. यासंदर्भात प्राप्त तक्रारींची तालुकास्तरीय समितीद्वारे पाहणी सुरू आहे. यामध्ये बियाणे सदोष निघाल्यास बियाणे कंपन्यांकडून परताव्यासाठी प्रयत्न करू.
- विजय चवाळे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी