‘नॅक'ने तपासली उत्तरपत्रिकांची सुरक्षितता

By Admin | Updated: December 23, 2015 00:14 IST2015-12-23T00:14:02+5:302015-12-23T00:14:02+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांसोबत संवाद साधून ‘नॅक’ समितीने मंगळवारी उत्तरपत्रिकांची सुरक्षितता तपासली.

Security of answer-sheets checked by 'nac' | ‘नॅक'ने तपासली उत्तरपत्रिकांची सुरक्षितता

‘नॅक'ने तपासली उत्तरपत्रिकांची सुरक्षितता

विविध विभागांची पाहणी : परीक्षा नियंत्रकांशी संवाद
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांसोबत संवाद साधून ‘नॅक’ समितीने मंगळवारी उत्तरपत्रिकांची सुरक्षितता तपासली. परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते यांनी परीक्षा विभाग, मूल्यांकन कक्षासह एकंदरीत परीक्षा पध्दती, मूल्यांकन पध्दत, पुनर्मूल्यांकनाचे आॅनस्क्रीन सादरीकरण केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून दरवर्षी एका सत्रात ६०० पेक्षा अधिक परीक्षा घेण्यात येतात. अमरावतीसह यवतमाळ, वाशीम, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील ५ लाख विद्यार्थी विद्यापीठाशी जुळले आहेत. त्यासाठी विद्यापीठ परिसरात मूल्यांकन भवन आहे. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठाचे स्वतंत्र अ‍ॅप आणि ‘आॅनस्क्रिन’सादरीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासर्व बाबींचे सादरीकरण नॅकसमोर करण्यात आले. उत्तरपत्रिकांची सुरक्षितता आणि प्रमाणपत्रांची पडताळणी या विषयावर नॅकच्या ‘टीम ए’ ने वस्तुस्थिती जाणून घेतली.
दुसऱ्या दिवशी १४ व्या सत्रात नॅकच्या ‘बी टीम’ने ‘इंटरनल क्वॉलिटी अ‍ॅश्युरंस सेल’च्या संचालकांसह सदस्यांसोबत बैठक घेतली. विशेष म्हणजे ‘बी टीम’ने विद्यापीठातील तरण तलावाचे निसर्ग सौंदर्य देखील अनुभवले.
तत्पूर्वी नॅकच्या ए आणि बी टीमने ग्रंथालय शास्त्र, निरंतर प्रौढशिक्षण विभाग, सांख्यिकी, गणित, प्राणीशास्त्र, शारीरिक शिक्षण, मराठी, समाजशास्त्र, कायदा, भौतिकशास्त्र, इंग्रजी आणि भूगर्भशास्त्र विभागांची पाहणी केली.
दुसऱ्या दिवसाच्या १२ व्या सत्रात ‘नॅक’ समितीने विद्यापीठाशी संलग्न संस्था प्रमुखांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)

समाधानाचा शेरा
नॅकच्या ९ सदस्यीय समितीने दौऱ्याच्या दोन दिवसांमध्ये विद्यापीठातील प्रशासकीय प्रमुखांसह विविध विभागप्रमुखांशी चर्चा करून विद्यापीठाचा एकंदरीत हालहवाल जाणून घेतला. चार दिवसीय पाहणी दौऱ्यातील २ दिवसांच्या अखेरीस नॅक समितीने समाधानाचा शेरा दिल्याचे अनौपचारिक चर्चेत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यापीठातील प्रत्येक विभाग प्रमुखांनी ‘नॅक’च्या आधी स्थानिक पातळीवर ‘मॉक’चा सामना केला होता. त्यामुळे पूर्वतयारीत आढळलेल्या त्रुटी विद्यापीठ प्रशासनाने आधीच भरून काढल्या आहेत. दरम्यान विद्यापीठ आवारातील तरणतलावाचे कौतुक करून नॅक समितीने येथे वृक्षारोपण केले.

बुधवारी आठ सत्र
बुधवार २३ डिसेंबरला नॅकची संपूर्ण टीम ग्रंथालयाला भेट देऊन इंटरनेट, रिडिंग रुम, संगणकीकरण या अंगाने निरीक्षण नोंदविणार आहे. याशिवाय उपहारगृह, वसतिगृहे, आरोग्य केंद्र, संगणक केंद्र, स्टुडंट अ‍ॅक्सेस सेंटर, वुमन्स स्टडी सेंटर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला भेट देतील. बुधवारी सकाळी ११ ते १ च्या कालावधीत मुख्य व लेखावित्त अधिकारी अािण कुलसचिवांशी संवाद साधतील. दुपारी २ ते ३ या कालावधीत विद्यापीठातील विविध अध्यासनांना भेटी देऊन शेवटच्या सत्रात ‘डाक्युमेंट्री इव्हिडन्स’ची तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Security of answer-sheets checked by 'nac'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.