The search for a woman's head began | महिलेच्या शिराचा शोध सुरू
महिलेच्या शिराचा शोध सुरू

ठळक मुद्देपोलिसांसमोर आव्हान : चांदुरी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : चांदुरी रिंगरोडवरील एका शेतातील विहिरीत आढळून आलेल्या मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही तसेच मृतदेहाचे शिरदेखील मिळालेले नाही. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान बडनेरा पोलिसांपुढे कायम आहे.
संजय टावरी यांच्या शेतातील विहिरीमध्ये महिलेचा नग्न मृतदेह असल्याची माहिती बडनेरा पोलिसांना मंगळवारी प्राप्त झाली होती. बुधवारी सकाळी पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून काढला. या मृतदेहाचे शिर कापण्यात आले होते. तथापि, ते शिर विहिरीच्या पाण्यावर तसेच आसपास कुठेही आढळले नाही. मुंडके गायब असल्याने केवळ उर्वरित धडावरून मृताची ओळख पटविण्यासाठी कसरत बडनेरा पोलीस करीत आहेत. मिसिंगच्या तक्रारी तपासल्या जात आहेत. यादरम्यान विहिरीचे पाणी उपसून मुंडक्यासह अन्य काही हाती लागेल काय, याबाबत पोलीस कार्यवाही करण्याच्या बेतात आहेत. पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी, बबन फसाटे, उपनिरीक्षक एस.एस. आसोले, उमेश मारोडकर आदी या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

परिसर पिंजून काढला
हत्या झालेल्या महिलेचे शिर परिसरात आढळून येते काय, यासाठी बडनेरा पोलिसांनी परिसर पिंजून काढला. मात्र, गुरुवारी उशिरा रात्रीपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागू शकले नाही.

चप्पल मिळाली
पोलिसांना चक्रावून सोडणाऱ्या या प्रकरणात केवळ विहिरीजवळ लेडीज चप्पल तेवढी पोलिसांनी ताब्यात घेतली. तो एकमेव पुरावा त्यांच्या कितपत कामी येतो, पोलीस या महिलेची ओळख किती अवधीत पटवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The search for a woman's head began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.