शिकारीच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:09 IST2018-05-12T22:09:36+5:302018-05-12T22:09:48+5:30

शिकारीच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत
लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हा/पोहरा बंदी : बकरीच्या शिकारीसाठी आलेला बिबट्या शुक्रवारी तिवसा तालुक्यातील कुऱ्हा स्थित वाघदा व रहमाबादच्या सीमेवरील एका शेतातील विहिरीत पडला. कुऱ्हा-चांदूर रेल्वेच्या वनकर्मचाऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर पाच तासांनी त्याला सुखरूप विहिरीबाहेर काढले.
भारत मोतीसिंह बंगरे (रा. कुऱ्हा) यांच्या मालकीच्या शेतात शुक्रवारी पाच वर्षाचा बिबट्या बकऱ्यांच्या कळपावर चाल करून गेला. विक्रम बंगरे यांनी आरडाओरडा केल्यान बिबट्याने तेथून धूम ठोकली आणि विहिरीत पडला.
कुºहा वनविभागाची चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाली. कुऱ्हा व चांदूर रेल्वे रेस्क्यू पथकाने विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला बाहेर काढले. उपवनसंरक्षक हेमंत मिणा, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांच्या मार्गदर्शनात बिबट्याला वैद्यकीय तपासणीकरिता हलविले. यावेळी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, वनपाल वाडके, पोहराचे वनपाल विनोद कोहळे, चिरोडीचे वनपाल विनोद निर्मळ, वनरक्षक रवींद्र विधळे, शशिकांत कतलकर, प्रीती तिवारी, डोंगरे, आखरे, वनमजूर बिसू पठाण, विनायक लोणारे, वनरक्षक भावना पाताळवंशी यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी पं.स. सदस्य मंगेश भगोले, माजी सभापती प्रदीपसिंह पचलोरे, संतोष धुमाळे उपस्थित होते.
विहिरीवर जाळ्या बसवा
वनक्षेत्रालगत शेतातील विहिरींवर जाळ्या बसविण्याची मागणी काही दिवसांपूर्वी वाइल्ड लाइफ अवेरनेस रिसर्च अँड रेस्क्यू सोसायटीचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी मुख्य वनसरंक्षकांकडे केली होती.