रोगग्रस्त सोयाबीन शेत शिवाराला शास्त्रज्ञांची भेट
By Admin | Updated: September 11, 2015 00:32 IST2015-09-11T00:32:59+5:302015-09-11T00:32:59+5:30
तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून या पिकाला येलो मोझॅकसह कीड व बुरशीजन्य रोगाने ग्रासले आहे.

रोगग्रस्त सोयाबीन शेत शिवाराला शास्त्रज्ञांची भेट
शेतकऱ्यांची चिंता वाढली : रोग, कीडींचे निरीक्षण, शेतकऱ्यांना मार्गदर्शन
चांदूरबाजार : तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून या पिकाला येलो मोझॅकसह कीड व बुरशीजन्य रोगाने ग्रासले आहे. विविध रोग व किडींमुळे मागील वर्षापासून शेतकरी डबघाईस आला आहे.
यावर्षीही सोयाबीन हे पीक, येलो मोेझॅक, व्हाईट फ्लाय, स्टेमफ्लाय, रुटरॉढ, कॉलर सॅट व रायझोवरोनिया बटाटीकोला सारख्या अनेक कीडी व रोगांना बळी पडले आहे. मागील वर्षी या सर्व रोगांनी तालुक्यातील सोयाबीनचे १०० टक्के नुकसान झाले होते. तीच स्थिती पुन्हा उद्भवून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे शास्त्रज्ञ के.पी. सिंग व कृषी विद्यापीठाचे अमरावती सोयाबीन संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ योगेश इंगळे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या दोन्ही शास्त्रज्ञांनी तालुक्यातील, घाटलाडकी, सोनोरी, गणोजा, सुरळी, नानोरी शिवारातील शेतकऱ्यांच्या रोगग्रस्त सोयाबीन पिकांचे निरीक्षणांती शेतकऱ्यांशी संवाद साधून तातडीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. येलो मोझॅकबद्दल ते म्हणाले, हा रोग विषाणूजन्य असून बियाण्यांद्वारे किंवा पांढऱ्या माशीद्वारेच पसरतो. त्यासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरुन बीज प्रक्रिया करणे, पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे व पीक पेरणीनंतर सुरुवातीची रोगग्रस्त झाडे उपटून टाकणे हाच एकमात्र उपाय आहे. अशा विषाणूजन्य रोगावर जगात कोणतेही औषधी उपलब्ध नाही. त्यासाठी पांढऱ्या माशीचा बंदोबस्त करणे, रोगप्रतीकारक जातींचाच पेरा करणे, पिकाचा फेरपालट करणे व बीज प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. पुढील हंगामापासुन सोयाबीन पीकासाठी या पथ्य अवश्य पाळाव्यात असे सांगीतले. सोयाबीनचा आजच्या स्थितीचा विचार करता ते म्हणाले, सर्वप्रथम पांढऱ्या माशीचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी ५ लिटर पाण्यात अॅशेटामाप्राईड ३५ ग्रॅम व क्लोरोपायरीफॉस २० मिली एकत्र करून फवारावे. आजच्या दोणे भरण्याच्या अस्थेत १०० लिटर पाण्यात पोटॅशियम नायट्रेड किंवा १३-१०-४५ दोन किलो टाकून फवारणी करावी. यामुळे पिकाचे ७० टक्केपर्यंत नुकसानाची पातळी कमी करता येत, अशी माहिती शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी शास्त्रज्ञान सोबत, तालुका कृषी अधिकारी राजीव मेश्राम, मंडल कृषी अधिकारी बिजवे, चुडे, कृषी सहायक प्रवीण मोहोड, लोमटे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.