School for students from 9th to 12th, no response to college | नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांचा शाळा, कॉलेजला ‘नो रिस्पॉन्स’

नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांचा शाळा, कॉलेजला ‘नो रिस्पॉन्स’

ठळक मुद्देकोरोनाची धास्ती, १० हजारांचा पल्ला गाठला नाही

  लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासन आदेशानुसार २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या. मात्र पाच दिवसांनंतरही १० हजारांच्या पुढे विद्यार्थी शाळेत उपस्थिती दर्शवू शकले नाही. अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद, नगरपंचायतींच्या एकूण ५४८ शाळांमध्ये १.५५ लाख विद्यार्थी संख्या असल्याची नोंद शिक्षण विभागात आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शाळांना पालकांचा ‘नो रिस्पॉन्स’ हे वास्तव आहे.
शालेय अभ्यासक्रमांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नियमावलींचे पालन करून शिकवणीचे नियोजन केले आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य भीती लक्षात घेता ९८ टक्के पालकांनी लस नाही, तर शाळा नाही असा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनानंतरही पालकांनी शाळांना नकारघंटा कायम आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी झाली, मुलांचे काय, असा सवाल बहुतांश पालकांनी उपस्थित केला आहे. जीवापेक्षा शिक्षण मोठे नाही, अशा अनेक पालकांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या आहेत. मुलांना कोरोनाची लागण झाल्यास कुटुंबीयांच्या आराेग्याची काळजी कोण घेणार, असा सूर पालकांमधून उमटत आहे. लस आल्याशिवाय मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय वीरेंद्र गलफट या पालकाने घेतला आहे. हीच स्थिती शहरासह ग्रामीण भागातील पालकांची आहे. त्यामुळे जिल्हाभरात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस शाळा सुरू होऊनही विद्यार्थी संख्येने १० हजारांचा आकडा पार केलेला नाही, असे उपस्थितीहून दिसून येते. नववी ते बारावीपर्यत महापालिकेच्या माध्यमिक सहा शाळा असून, एकूण ४५० विद्यार्थ्यांपैकी दरदिवशी १४० ते १५० विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती महापालिका शिक्षणाधिकारी अब्दूल राजीक यांनी दिली. 
 

Web Title: School for students from 9th to 12th, no response to college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.