गावातील बेरोजगारांनी ग्रामपंचायतमध्ये सुरु केली शाळा
By Admin | Updated: August 12, 2014 23:28 IST2014-08-12T23:28:19+5:302014-08-12T23:28:19+5:30
मेळघाटात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला. चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सात पैकी पांच शिक्षक एक महिन्यापासून बेपत्ता आहेत.

गावातील बेरोजगारांनी ग्रामपंचायतमध्ये सुरु केली शाळा
नरेंद्र जावरे - अमरावती
मेळघाटात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला. चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सात पैकी पांच शिक्षक एक महिन्यापासून बेपत्ता आहेत. त्यामुळे संतप्त आदिवासींनी सोमवारपासून पाल्यांना शाळेत न पाठविता ग्राम पंचायत कार्यालयातच शाळा भरविली. तेथे गावातील डी.एड. बेरोजगार त्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.
चिखलदरा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये चुरणी गावाचा समावेश आहे. येथे जिल्हा परिषदेतर्फे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून विद्यार्थ्यांची संख्या १४८ आहे. मुख्याध्यापकासह सहायक शिक्षकांची सात पदे मंजूर असून पाच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गतवर्षीसुध्दा हाच प्रकार
एक महिन्यापासून दोनच शिक्षक सात वर्ग व मुख्याध्यापकाचा पदभार सांभाळीत आहेत. परिणामी आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा व्यवस्थापन, समिती व पालकांनी चिखलदरा पंचायत समितीला वारंवार शिक्षकांच्या नेमणूकीचे निवेदन दिले. परंतु त्यावर सतत दुलर्क्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एक महिन्यापासून शिक्षकांच्या नियुक्ति संदर्भात प्रशासनाने कुठलाच निर्णय घेतला नाही. परिणामी सोमवार पासून संतप्त पालकांनी जि.प. शाळेत पाल्यांना पाठविणे बंद केले व ग्राम पंचायत मध्ये शाळा भरविली. गावातील डीटीएड झालेले सुशिक्षित बेरोजगार राहुल येवले, आलोक अलोकार, सुमित चावरे, नागेश धोत्रे, संजय धुमावरे आदि विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. चुरणी शाळेत गतवर्षी सुद्धा बारा दिवस याच मुद्दावर शाळा बंद करण्यात आली होती.तेव्हा प्रतिनियुक्तिवर पाठविले होते. ते शिक्षक परत बोलविण्यात आले. त्यानंतर दिलेले शिक्षक तीन रजेवर तर मुख्याध्यापक निलंबित असल्याने हा प्रकार उघडकीस आले आहे. तर सुटीवरील गेलेल्या शिक्षकांची चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.