शाळा पोहचली विद्यार्थ्यांच्या अंगणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST2020-12-11T04:38:57+5:302020-12-11T04:38:57+5:30
चांदूर रेल्वे : कोरोनाची धास्ती कमी होत असली तरी अजूनही प्राथमिक शाळा सुरू होण्याचे चिन्ह दिसत नाही. शाळा बंद ...

शाळा पोहचली विद्यार्थ्यांच्या अंगणी
चांदूर रेल्वे : कोरोनाची धास्ती कमी होत असली तरी अजूनही प्राथमिक शाळा सुरू होण्याचे चिन्ह दिसत नाही. शाळा बंद असले तरी शिक्षण सुरू, या उपक्रमानुसार ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात ठेवण्याचे काम शिक्षण विभागाकडून होत असतानाच आता गुरुजींनी शाळाच विद्यार्थ्यांच्या अंगणी पोहचवली आहे.
कोरोनाच्या काळात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यावर सर्वत्र जोर वाढला. पण जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात या ऑनलाइन शिक्षणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. काही शिक्षकांनी अतिशय तळमळीने शिक्षण पोहचविण्याचा प्रयत्न केला. त्यात काहीअंशी यश आले. पण, सार्वत्रिक चित्र तसे नाही. अशातच शासनाने एका नव्या सूचनेनुसार शाळा विद्यार्थ्यांच्या अंगणात पोहोचवायला लावल्या. त्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील घराघराच्या भिंती बोलक्या होत आहेत. या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने गावातील मुख्य भिंतीवर शैक्षणिक पोस्टर लावून संपूर्ण गावालाच शाळेचे स्वरुप दिले आहे. गणित, भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्र अशा अनेक विषयांचे पोस्टर विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडेल, अशा जागेवर लावण्यात येत आहे. या उपक्रमातच शाळेतील एलईडी, टीव्ही स्पिकर यांचाही वापर करून विद्यार्थ्यांना ऐकू जाईल, अशाप्रकारे अध्यापनाच्या चित्रफीत शाळेमार्फत दाखविल्या जात आहे. गावात विद्यार्थी खेळतात किंवा ज्या ठिकाणी जास्त रमतात, त्याच भागात शालेय पोस्टर लावल्याने खेळण्यासोबत अभ्यासही होत असल्याच्या प्रतिक्रिया काही पालकांनी दिल्यात.
कोट
शासनाच्या प्रत्येक उपक्रमाची अंमलबजावणी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या व इतर खासगी शाळेत सुरू आहे. शाळा बंद परंतु शिक्षण सुरू, या अंतर्गत विविध माध्यमातून अध्यापन कार्य सुरू आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या अंगणी या उपक्रमाचीही अंमलबजावणी होत आहे.
- मुरलीधर राजनेकर, गटशिक्षणाधिकारी