शाळेचे गेट कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू
By Admin | Updated: August 7, 2014 23:41 IST2014-08-07T23:41:16+5:302014-08-07T23:41:16+5:30
नगरपालिकेच्या शाळेचे लोखंडी गेट अंगावर कोसळल्याने इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जुन्या दर्यापुरात ही दुर्दैवी घटना घडली.

शाळेचे गेट कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू
दर्यापूर : नगरपालिकेच्या शाळेचे लोखंडी गेट अंगावर कोसळल्याने इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जुन्या दर्यापुरात ही दुर्दैवी घटना घडली.
सानिया तबस्सुम शे. उमर (९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नगरपालिकेच्या डॉ. अल्लामा इक्बाल मुलींच्या प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी होती. शाळेमध्ये भले मोठे लोखंडी गेट बसविण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. नव्याने आणलेले वजनदार लोखंडी गेट शाळेच्या भिंतीला टेकवून ठेवले होते. शाळेच्या मधल्या सुटीत विद्यार्थिनी लोखंडी द्वारासोबत खेळू लागल्या. या दरम्यान टेकवून ठेवलेले गेट सानियाच्या अंगावर कोसळले. त्यामध्ये सानियाच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. यावेळी तेथे सुरक्षिततेची कोणतीच व्यवस्था नव्हती. ही घटना घडताच काही वेळाने मुख्याध्यापक व शिक्षकांनी या विद्यार्थिनीला येथील उपजिल्हा रुग्णालय व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तथापि अधिक रक्तस्रााव झाल्याने उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.