सावित्रीच्या २५ हजार लेकींची लघुउद्योगात भरारी
By Admin | Updated: January 3, 2016 00:32 IST2016-01-03T00:32:42+5:302016-01-03T00:32:42+5:30
नशिबाला संधीची गरज असते. ही संधी प्रत्येकाच्या आयुष्यात अधून- मधून डोकावते. याचा लाभ घेत जिल्ह्यातील ...

सावित्रीच्या २५ हजार लेकींची लघुउद्योगात भरारी
सामूहिक शेतीत पुढाकार : मुंबईच्या बाजारात अमरावतीतील बचत गटाच्या वस्तूंची मागणी
मोहन राऊ त अमरावती
नशिबाला संधीची गरज असते. ही संधी प्रत्येकाच्या आयुष्यात अधून- मधून डोकावते. याचा लाभ घेत जिल्ह्यातील सावित्रीच्या २५ हजार लेकींनी बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योगात भरारी घेतली आहे़ मुंबई-पुण्याच्या बाजारात आज बचत गटाने निर्माण केलेल्या विविध वस्तंूची मागणी वाढली आहे़ सामूहिक शेतीतही त्यांनी पुढाकार घेतला आहे़
अमरावती जिल्ह्यात १३ हजार ८२४ महिला बचत गट कार्यान्वित आहेत़ मागील पाच वर्षांत या बचत गटाने लघु उद्योगात यशस्वी पाऊल उचलले आहे़ शेळी मेंढी पालन, पापड उद्योग, दुग्ध व्यवसाय, खानावळ, बांबूपासून निर्मिती केलेल्या वस्तू, लाकडी बैलबंडी, अशा लघुउद्योगातून जिल्ह्यात एका वर्षात सात कोटींच्या घरात व्यवसाय करण्यात आला आहे़
११ महिलांचा बचत गट असलेल्या एका गटाला प्रथम २५ हजार रूपये फिरता निधी देण्यात येतो. यात १० हजार रूपयांची सवलत, १५ हजार रूपये संबंधित बँकेच्या कर्ज खात्यात भरावे लागते़ तद्नंतर बचतीच्या पाच ते आठ पट कर्ज देण्यात येते़ ५० हजार रूपये देण्यात येणाऱ्या या कर्जात शासनाची सवलत मिळते़
संबंधित कर्जाची परतफेड केल्यानंतर एक लाखाच्या वरील कर्ज संबंधित गटाला देण्यात येते़
आज या कर्जाच्या माध्यमातून प्रत्येक महिलांच्या संसारात आर्थिक हातभार लागत आहे, हे केवळ त्यांच्या शिक्षणाचे द्योतक आहे.
वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव
महिला बचत गटांची स्थापना ही केवळ बचत व कर्ज घेण्याएवढीच नसून जिल्ह्यातील आठ हजार महिला बचत गटांनी लघु उद्योगात व्यक्तिगत कौशल्याला महत्त्व दिले आहे़ वेळेचे नियोजन, अर्थकारणाची सांगड, जबाबदारीची जाणीव, जोखीम स्वीकारण्याची वृत्ती, परिस्थिती हाताळण्याची कला व यशस्वी होण्याची क्षमता, नेतृत्व गुण चोख व्यवहार यामुळे हे महिला बचत गट यशस्वी ठरले आहे़
सामूहिक शेतीत पुढाकार
शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या काही महिलांनी आपला बचत गट तयार करून सामूहिक शेती मागील चार वर्षांपूर्वी सुरू केली़ या सामूहिक शेतीतून सोयाबीन, कपाशी, गहू, हरभरा पिकेच नव्हे, तर थेट भाजीपाला तसेच विविध उत्पन्न काढून दीडशे महिला बचत गट आघाडीवर आहेत़
धामणगावच्या
बचत गटांची मुंबई वारी
धामणगाव रेल्वे तालुक्यात आठ वर्षांपासून खानावळ व्यवसाय सांभाळणाऱ्या तळेगाव दशासर येथील रमाई महिला बचत गट व मेणबत्यापासून विविध वस्तू तयार करीत असलेल्या जळका पटाच्या येथील भिमाई महिला बचत गटाने मुंबईत भरारी घेतली़ मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनीमध्ये या गटाची निवड विस्तार अधिकारी मिलिंद ठुणुकले यांच्या मार्गदर्शनाने झाली आहे़
निर्णयाचे होते पालन
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अहमद यांनी जिल्ह्यातील काही महिला बचत गटांच्या सभेच्या वृत्ताचे वाचन केले़ यात वेळेवर सभा घेणे, सभेत विषय मांडणे, त्यावर चर्चा करणे इतिवृत्तांत लिहिणे, हिशोबाच्या वह्या व्यवस्थित ठेवणे, गटाच्या निर्णयाचे पालन करणे, बैठकीची पूर्वतयारी करणे, विषय पत्रिका लिहिणे या सर्व बाबी अत्यंत पारदर्शकपणे महिला बचत गट करीत असल्याचे पाहावयास मिळाले़
जिल्ह्यात आयोजित करण्यात येत असलेल्या विकास गंगोत्रीमधून महिला बचत गटाच्या विविध लघु उद्योगांना उभारी मिळते़ पंचायत समितीचे मार्गदर्शन व बँकेचे सहकार्य तसेच महिलांमध्ये आपला बचत गट आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याची असलेली जिद्द त्यामुळे सावित्रीच्या लेकींनी लघुउद्योगात भरारी घेतली आहे़
- प्रमोद कापडे,
प्रभारी संचालक,
जिल्हा ग्रामीण विकास.