‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियानापासून जिल्हा दूरच
By Admin | Updated: August 7, 2014 23:43 IST2014-08-07T23:43:00+5:302014-08-07T23:43:00+5:30
जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचे धोरण शासनाचे आहे. या अभियानाला लोक सहभागातून चालना देण्यासाठी ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ स्पर्धा आयोजित केली आहे.

‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियानापासून जिल्हा दूरच
अमरावती : जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचे धोरण शासनाचे आहे. या अभियानाला लोक सहभागातून चालना देण्यासाठी ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ स्पर्धा आयोजित केली आहे.
१५ जूनपासून सुरू झालेले हे अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत ग्रामस्तरावर राबवावयाचे आहे. मात्र, हे अभियान राबविण्यात अडचणी येत असल्याने जिल्ह्यात याबाबत उदासीनताच असल्याचे दिसून आले आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून पाणीटंचाईवर मात करता येते आणि पर्यावरणाचा समतोलही साधता येतोे. या उद्देशाने पावसाचे पाणी अडविण्यावर राज्य शासनाने विशेष भर दिला आहे. उपक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘पाणी साठवा गाव वाचवा’ स्पर्धा आयोजित केली आहे. या हेतूने सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीही झाल्या.
पदाधिकाऱ्यांचा सहभाग अपेक्षित
अभियान राबविण्यासाठी ग्रा.पं. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी गावाच्या पाणीप्रश्नासाठी प्राधान्याने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत अधिनियमानुसार गावातील लोकांना आणि जनावरांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. त्यादृष्टीने हे अभियान राबविले जात आहे. अभियान अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.