अमरावतीतील ऐतिहासिक खापर्डे वाड्याचे जतन करा

By Admin | Updated: May 21, 2015 00:26 IST2015-05-21T00:26:00+5:302015-05-21T00:26:00+5:30

येथील राजकमल चौकातील स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रख्यात वकील श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या ऐतिहासिक खापर्डे ....

Save the historic pavement in Amravati | अमरावतीतील ऐतिहासिक खापर्डे वाड्याचे जतन करा

अमरावतीतील ऐतिहासिक खापर्डे वाड्याचे जतन करा

मागणी : गजानन महाराजांचाही होता मुक्काम
अमरावती : येथील राजकमल चौकातील स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रख्यात वकील श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या ऐतिहासिक खापर्डे वाड्याचे महापालिकेने जतन करावे, अशी मागणी संत गजानन महाराज यांच्या भक्तांकडून जोर धरू लागली आहे.
संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुणीत झालेली ही एक आध्यात्मिक वास्तू असून येथून अनेक क्रांतिकारक चळवळी चालविल्या गेल्या. त्यामुळे अंबानगरीचे वैभव असलेल्या या वाड्याची दखल अंबानगरीत गुरुवारी दौऱ्यावर येत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्र्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा भाविक, नागरिकांची आहे.
श्रीमंत दादासाहेब खापर्डे हयात असताना संत गजानन महाराजांनी या वाड्यात तीन दिवस वास्तव्य केले होते. ते येथील औदुंबराच्या झाडाखाली व विहिरीजवळ बसायचे. काही काळ त्यांनी तेथे विश्रांती घेतली होती, असा उल्लेख दासगणू महाराजांच्या पोथीतही आहे.
'लोकमत'ने या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व लोकदरबारात मांडल्यानंतर येथे भक्तांचा आजता गुरुवारी राबता असतो. या ऐतिहासिक औदुंबराच्या झाडाचे दर्शन घेण्यासाठी प्रकट दिनाला मोठी गर्दी झाली होती. रामनवमी, हनुमान जयंतीलाही येथे महाप्रसादाचे आयोजन भाविकांतर्फे करण्यात आले होते. यावर्षी ऐतिहासिक गुढीही येथे उभारण्यात आली. दर गुरुवारी येथे भाविक स्वयंस्फूर्तीने येऊन आरती करतात. दादासाहेब खापर्डे यांच्या वशंजांनी ही वास्तू एका खासगी व्यापाऱ्याला काही वर्षांपूर्वी विकल्याचे कळते. परंतु या ऐतिहासिक वाड्याचे जतन त्या खासगी व्यापाऱ्याने केले नाही. वाड्याची अतिशय दूरवस्था आहे.
ज्या औदुंबराच्या झाडाखाली संत गजानन महाराजांनी विश्रांती घेतली होती, ते झाड डौलाने आजही उभे आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले जाईल. (प्रतिनिधी)

भगतसिंग, टिळक, आंबेडकर...
या वाड्याला मोठा इतिहास असून लोकमान्य टिळक, अरविंद घोष, वीर वामनराव जोशी, सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग, राजगुरू, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आदींनी येथे भेटी दिल्या. हे वैभव भावी पिढीतही कायम रहावे, या उद्देशाने ही ऐतिहासिक वास्तू महापालिकेने ताब्यात घेऊन याचे संवर्धन करावे, अशी अपेक्षा नागरिकांचीही आहे.

Web Title: Save the historic pavement in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.