सतीश मडावीला वीरमरण; समाजमन गहिवरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:31 IST2018-05-27T23:31:22+5:302018-05-27T23:31:39+5:30
अवैध धंदेवाईकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सतीश मडावीच्या आकस्मिक मृत्यूने त्याचे कुटुंबीयच नव्हे, समाजमन सुन्न झाले. कारवाईवेळी पोलिसांवर हल्ला होऊन हत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे.

सतीश मडावीला वीरमरण; समाजमन गहिवरले
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : अवैध धंदेवाईकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सतीश मडावीच्या आकस्मिक मृत्यूने त्याचे कुटुंबीयच नव्हे, समाजमन सुन्न झाले. कारवाईवेळी पोलिसांवर हल्ला होऊन हत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. केवळ वेतन घेण्यासाठी नोकरी नसून आपल्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली, तिचे वहन करताना सामाजिक बांधिलकी जोपासणारा पोलीस कर्मचारी म्हणून मडावी पोलीस दलात ओळखले जायचे. चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सतीश मडावी यांना अवैध धंद्यावर धाड टाकताना जे वीरमरण आले, त्या घटनेवरून अवैध व्यवसायांवर धाड टाकताना मोठा ताफा घेऊन जाण्याची खबरदारी पोलीस यंत्रणेला घ्यावी लागणार असल्याची प्रतिक्रिया उमटली. ठाणेदार ब्रम्हानंद शेळके यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मडावी यांच्या आकस्मिक जाण्याने मोठा मानसिक धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच सतीश मडावीची पत्नी, आई, ११ वर्षांची मुलगी, ६ वर्षांचा मुलगा चांदूररेल्वेत दाखल झाले. ग्रामीण रूग्णालयात पतीचे पार्थिव पाहताना त्यांच्या पत्नीचा आक्रोश मन हेलावणारा होता. मडावी मूळचे यवतमाळ जिल्ह्यातले होते. ते अमरावती शहरात कार्यरत असताना त्यांनी पोटे टाऊनशिपमध्ये घर विकत घेतले. मुलांचे शिक्षण दर्जेदार शाळेतून व्हावे, यासाठीच ते अमरावतीला स्थायिक झाले होते. सतीश मडावी यांची जी हत्या झाली ती अतिशय क्रूरतेनेच. गरम पाणी फेकणे, पायावर मारणे, खाली पडताच त्यांच्या डोक्यावर मोठा दगड घालण्यात आला. सकाळी ८.४५ वाजता सतीश मडावी यांनी मांजरखेड येथील रहिवासी माधव कावलकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत हल्ल्याची माहिती दिली. कावलकर पोलीस पाटील प्रफुल्ल गुल्हाने यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले असता मडावी मृतावस्थेत आढळले.
चूक की दुर्लक्ष?
गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी दोन्ही पोलीस नि:शस्त्र गेले होते. त्यामुळे ते आरोपींचा कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करू शकले नाहीत. ही चूक की दुर्लक्ष, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आरोपींनी हल्ला केल्यानंतर दोन्ही पोलिसांच्या अंगावर उकळते पाणी फेकल्याचे आढळून आले आहे. हल्ल्याची स्थिती निर्माण होईल, याविषयी पोलिसांनी सतर्कता बाळगली नाही, त्याबाबत चांदुररेल्वेत चर्चा सुरु होती.