आता रेल्वे मालमत्तांवर सॅटेलाइटने ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:20 IST2019-03-28T13:19:39+5:302019-03-28T13:20:53+5:30
रेल्वे स्थानक आणि त्याभोवताल खुल्या जागांवरील वाढत्या अतिक्रमणावर १ एप्रिल २०१९ पासून सॅटेलाइटने ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. त्याअनुषंगाने रेल्वेने इस्रोसोबत करार केला आहे.

आता रेल्वे मालमत्तांवर सॅटेलाइटने ‘वॉच’
लोकमत न्यूज नेटवर्क
गणेश वासनिक
अमरावती : रेल्वे स्थानक आणि त्याभोवताल खुल्या जागांवरील वाढत्या अतिक्रमणावर १ एप्रिल २०१९ पासून सॅटेलाइटने ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. त्याअनुषंगाने रेल्वेने इस्रोसोबत करार केला आहे. मालमत्तांचे संरक्षण करण्यात रेल्वे सुरक्षा दल कुचकामी ठरल्याचा ठपकादेखील रेल्वे बोर्डाने ठेवला आहे.
देशात रेल्वेची मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. खुले भूखंड आणि बहुतांश जागांवर लोखंडी साहित्य व अन्य मालमत्ता असून, त्यांची देखभाल, संरक्षण करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून रेल्वे स्थानक, खुले भूखंड, कर्मचारी वसाहती, विश्रामगृह, अधिकाऱ्यांचे बंगले आदी मालमत्तांबाबतची नोंद उपग्रहाच्या नियंत्रणात केली जाणार आहे. मुंबई मध्य रेल्वे विभागांतर्गत पाचही विभागांत एक नियंत्रण कक्ष राहील. त्यानुसार नागपूर व भुसावळ मुख्यालयी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या कक्षांना सर्व मालमत्तांची माहिती प्राप्त होईल. मुंबई येथे मुख्य नियंत्रण कक्ष इस्रोला जोडण्यात आले आहे.
दरम्यान, रेल्वेच्या सर्व मालमत्तांंचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जीआयएस पोर्टल विकसित करण्यात आले असून, ते पूर्णपणे जीपीएस प्रणालीवर आधारित आहे. रेल्वे प्रशासनाला डिसेंबर २०१८ मध्ये हे पोर्टल उपलब्ध झाले. पोर्टलसाठी सीआरआयएस (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स) नव्या अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे.
२४ तास मालमत्तांवर लक्ष
रेल्वे स्थानक, मालमत्तांच्या मॅपिंगच्या हिशेबाने उपग्रहात चिन्हांकित स्थान अपलोड करण्यात आले आहेत. त्याद्वारे २४ तास अशा स्थानांवर नजर ठेवली जाणार असून, यात रेल्वे स्थानकांचादेखील समावेश आहे. अतिक्रमण आढळल्यास रेल्वेच्या विभागीय केंद्रातून ही माहिती रेल्वे सुरक्षा यंत्रणेला दिली जाणार आहे.
विदर्भात अतिक्रमणाची मोठी समस्या
विदर्भात नागपूर, वर्धा, पुलगाव, गोंदिया, भंडारा, अकोला, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकांच्या हद्दीत अतिक्रमण वाढीस लागले आहे. बहुतांश रेल्वे स्थानकाच्या प्रवेशाद्वाराला अतिक्रमणाचा वेढा आहे. ते हटविण्यासाठी प्रशासन पाऊल उचलत नाही.
‘‘ रेल्वे मालमत्तांचे सॅटेलाइटने संरक्षण होणार असल्याने चोरीच्या घटनांवर अंकुश लावता येईल. रेल्वेच्या खुल्या जागांवर अतिक्रमण ही समस्या गंभीर असून, आता वरिष्ठांकडून याप्रकरणी दखल घेतल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने ही समस्या दूर करता येईल.
- शरद सयाम,
मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक, बडनेरा