सॅनिटायझर, मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:56+5:30
तात्काळ अंमलबजावणी करावी. नाल्यांची स्वच्छता करावी. डास निर्मूलनावर भर द्यावा, जेणेकरून अन्य संसर्गजन्य आजार वाढणार नाहीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाने जारी केलेले सर्व आदेश व सूचनांचे पालन व्हावे. शासकीय कार्यालयांतही सॅनिटायझर उपलब्ध असावे. त्याचा वापर व्हावा. कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये, असे पालकमंत्र्यांनी यंत्रणेला बजावले.

सॅनिटायझर, मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करा. मास्कची किंमत वाढवणे, जादा फी घेणे असे कुठलेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आपत्तीच्या आडून नागरिकांना घाबरविण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही, अशी तंबी सोमवारी पालकमंत्र्यांनी दिली. नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी ‘मिशन मोड’वर काम करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजनांच्या अनुषंगाने यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असावा व वैद्यकीय यंत्रणेने सजग राहावे, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात स्वच्छतेसाठी फॉगिंग आदी उपायांची तात्काळ अंमलबजावणी करावी. नाल्यांची स्वच्छता करावी. डास निर्मूलनावर भर द्यावा, जेणेकरून अन्य संसर्गजन्य आजार वाढणार नाहीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाने जारी केलेले सर्व आदेश व सूचनांचे पालन व्हावे. शासकीय कार्यालयांतही सॅनिटायझर उपलब्ध असावे. त्याचा वापर व्हावा. कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये, असे पालकमंत्र्यांनी यंत्रणेला बजावले.
बैठकीला आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस अधीक्षक हरिबालाजी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक लांडे, डॉ. अनिल रोहणकर यांच्यासह अन्न व औषध प्रशासन तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
आयएमएचेही सहकार्य घ्या
परदेशातून परतलेल्या व्यक्तींची दक्षतापूर्वक तपासणी व्हावी. अशा व्यक्तींनी व त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून माहिती द्यावी. वैद्यकीय पथकांनी वेळोवेळी त्यांच्या संपर्कात राहावे. योग्य ती दक्षता घेतल्याने संसर्ग टाळता येत असल्याबाबत व्यापक जनजागृती करावी. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या माध्यमातून जनजागृती कार्यात डॉक्टर मंडळींनाही सहभागी करून घ्यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
कोरोनाचा सर्व मिळून मुकाबला करू
नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घेणे आवश्यक आहे. कुठलीही माहिती लपवून ठेवू नये. शासनाकडून उपाययोजनांसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. नागरिकांनीही दक्षता बाळगून सहकार्य करावे. सर्व मिळून कोरोना विषाणू संसर्गाचा यशस्वी मुकाबला करूया, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. जनजागृती मोहिमेत योगदान देण्यात येत असल्याचे आयएमएचे डॉ. लांडे व डॉ. रोहणकर यांनी सांगितले.
जीवनवश्यक वस्तू केंद्राला अद्याप बंदी नाही
जीवनावश्यक वस्तू विक्री केंद्रांना अद्याप बंदी घातलेली नाही. सर्व सार्वजनिक समारंभ, कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विवाह समारंभ नियोजित असल्यास, मोठा समारंभ टाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह साजरा करावा. समारंभ काही कालावधीनंतर साजरा करता येईल. गर्दी टाळा हे महत्त्वाचे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याप्रसंगी केले.