समृद्धी महामार्ग बनेल 'ग्रीन हायवे' वनविभागाला दिली १० लाख वृक्ष लागवड आणि देखभालीची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:48 IST2025-09-16T13:46:27+5:302025-09-16T13:48:27+5:30

वनविभागाकडे जागेचे हस्तांतरण : नागपूर ते मुंबईदरम्यान ७०१ किमी अंतरावर लागणार झाडे

Samruddhi Highway will become 'Green Highway' Forest Department given responsibility for planting and maintaining 10 lakh trees | समृद्धी महामार्ग बनेल 'ग्रीन हायवे' वनविभागाला दिली १० लाख वृक्ष लागवड आणि देखभालीची जबाबदारी

Samruddhi Highway will become 'Green Highway' Forest Department given responsibility for planting and maintaining 10 lakh trees

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला वृक्षलागवडीत अपयश आल्याने समृद्धी महामार्गावरील नागपूर ते मुंबई या ७०१ किमी अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावण्याची जबाबदारी आता वनविभागाकडे सोपविण्यात आली आहे. वनविभागच झाडे लावणार असून पुढील पाच वर्षे त्यांची देखभाल करणार आहे. त्याअनुषंगाने जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होऊन तीन वर्षे उलटली असली तरी या मार्गावरील आवश्यक सुविधा आणि पर्यावरणीय बाबींवर हायवे अॅथॉरिटीने पुरेसे लक्ष दिले नाही, अशी टीका होत आहे. ७०१ किमी लांबीचा हा मार्ग हिरवागार करण्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) अपयश आले आहे. यापूर्वी एमएसआरडीसीने समृद्धीवर उंच झाडे लावण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले होते. मात्र, संबंधित कंपनी ही जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील हायवे, समृद्धी महामार्ग, राज्य महामार्गावर १० कोटी वृक्ष लागवड, आंतर वृक्षरोप वनाची जबाबदारी वनविभागाला सोपविली आहे. त्यानुसार वनविभाग समृद्धी महामार्ग हिरवागार करण्याचे काम हाती घेणार आहे. 

समृद्धी महामार्गाचे हस्तांतरण

नागपूर ते मुंबई यादरम्यान ७०१ किमी अंतराच्या समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजू तसेच रस्ता दुभाजकाच्या मधोमध उंच झाडे, फुलझाडे लावण्यासाठी 'एमएसआरडीसी' आणि वनविभाग यांच्यात ५ वर्षांसाठी करार झालेला आहे. या करारानुसार वनविभाग समृद्धी महामार्गावर दिलेल्या जागेवर लवकरच झाडे लावणार आहे. तशा सूचना वनविभागाने संबंधित वनाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पाच वर्षे देखभाल, सुरक्षेची जबाबदारी

समृद्धी महामार्ग 'ग्रीन हायवे' करण्यासाठी वनविभाग यंदा दोन व तीन रांगेत उंच झाडे लावणार आहे. लागवड केलेल्या झाडांची तब्बल ५ वर्षे देखभाल, सुरक्षेची जबाबदारी वनविभागाची असेल. ५ वर्षांनंतर वाढलेली झाडे वनविभाग 'एमएसआरडीसी'ला ताब्यात देईल. समृद्धी महामार्ग ग्रीन हायवे करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने १० लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय रस्ता दुभाजकात शोभिवंत फुलझाडे आणि इतर प्रजातीचे झाडे लावण्यात येणार आहेत. तसे नियोजन वनविभागाने केलेले आहे.

पाच किमी अंतरावर एकाच प्रजातीच्या झाडांची लागवड होणार

समृद्धी महामार्गावर पाच किमी अंतरावर एकाच प्रजातीच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. यात वड, पिंपळ, उंबर, नादुख, पिंपरन, आपटा, काटेसावर, निम, पिचकारी, शिसु, करंज या झाडांच्या प्रजातीसह कन्हेर, बोगनवेल, बॉटल ब्रश, मोगरा, फायकस, शंकासूर, फ्रींग, चाफा-बहावा, गुलमोहर, निळा मोहोर आदी प्रजातींचा समावेश असणार आहे.

Web Title: Samruddhi Highway will become 'Green Highway' Forest Department given responsibility for planting and maintaining 10 lakh trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.