सेल्स एक्झिक्यूटिव्हला मोर्शीतून अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 19:36 IST2017-12-16T19:36:32+5:302017-12-16T19:36:38+5:30
कालबाह्य माल पाठवून चार लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी एका सेल्स एक्झिक्यूटिव्हला मोर्शीतून अटक केली.

सेल्स एक्झिक्यूटिव्हला मोर्शीतून अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती : कालबाह्य माल पाठवून चार लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी एका सेल्स एक्झिक्यूटिव्हला मोर्शीतून अटक केली. मनीष कृष्णराव देशमुख (३४, रा. दीपनगर, मोर्शी) असे आरोपीचे नाव आहे.
शहरातील गजानननगर येथील रहिवासी जगदीश डोंगरे हे सेवानिवृत्त न्यायाधीश असून, त्यांना औरंगाबाद येथील ऑल फ्रेश प्रॉडक्ट या कंपनीने सुपर स्टॉकिस्ट म्हणून नियुक्त केले होते. कंपनीचा खरेदी केलेला माल मुदतबाह्य असल्याचे त्यांना आढळून आले. तो कंपनीला परत पाठविल्यानंतर त्यांचे चार लाख रुपये मिळाले नाहीत. यासंदर्भात त्यांनी १० मार्च २०१४ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात डोंगरे यांनी तक्रार नोंदविली. त्यावर पोलिसांनी भादंविच्या कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. या प्रकरणात पोलिसांनी प्रथम महबूब खानला अटक केली. कंपनीचे मालक जुनेद खान याला उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी २०१४ पासून पसार होता. चौकशीदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने सेल्स मॅनेजर शेख शारीक शेख हयातोद्दीन (४४, रा. प्रियदर्शनी कॉलनी, मडेगाव, औरंगाबाद) याला शुक्रवारी औरंगाबाद येथे अटक करून अमरावतीत आणले. त्याला १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी मोर्शीतून मनीष देशमुखला अटक केली. त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक अतुल वर, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, शिपाई राजेंद्र शेंडे, ईश्वर चक्रे, शैलेश रोंघे यांनी ही कारवाई केली.