‘शॉक’ टाळण्यासाठी सुरक्षेचे नियम
By Admin | Updated: April 5, 2016 23:59 IST2016-04-05T23:59:03+5:302016-04-05T23:59:03+5:30
उन्हाळा सुरू झाला की, ‘कुलरचा शॉक लागून मृत्यू’ होण्याच्या घटना वारंवार घडतात. कुलरच्या माध्यमातून विजेचा धक्का बसल्याने दरवर्षी अनेकांचे प्राण जातात.

‘शॉक’ टाळण्यासाठी सुरक्षेचे नियम
कुलरचा सुयोग्य वापर करा : महावितरणचे आवाहन
अमरावती : उन्हाळा सुरू झाला की, ‘कुलरचा शॉक लागून मृत्यू’ होण्याच्या घटना वारंवार घडतात. कुलरच्या माध्यमातून विजेचा धक्का बसल्याने दरवर्षी अनेकांचे प्राण जातात. हे प्रकार टाळण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरण कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.
उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घर, दुकान, कार्यालये अशा सर्वच ठिकाणी कुलरचा वापर केला जातो. उष्म्यापासून दिलासा मिळविण्यासाठी कुलरचा वापर होत असला तरी कुलर वापरताना काळजी न घेतल्यास नुकसान होऊ शकते. कुलरचा वापर करताना काही पथ्ये पाळल्यास वाढत्या तापमानामध्ये सुरक्षित गारवा अनुभवता येईल.
कुलरचे कनेक्शन, वायरिंग व अर्थिंगची योग्य तपासणी इलेक्ट्रीशियनकडून करून घ्यावी, अर्थिंग व्यवस्थित असल्यास विजेची गळती होत नाही. पंपातून पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद करून त्यानंतरच कुलरला हात लावावा. ओल्या हातांनी कुलरला कधीही स्पर्श करु नये. लहान मुलांना नेहमी कुलरपासून दूर ठेवावे. त्याच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह संचारू नये, यासाठी त्याचा थेट जमिनीशी संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी. कुलरमधील पाण्याचा पंप पाच मिनिटे सुरू आणि दहा मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करावा. कुलर हलविताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी, कुलरचा पंप अधुनमधून बंद करावा. घरामध्ये अर्थलिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावा, अशा सूचना महावितरण कंपनीने केल्या आहेत. योग्य वेळी ही काळजी घेतल्यास कुलरमुळे होणारे अपघात बऱ्याच प्रमाणात घटू शकतात व सुरक्षित गारवा अनुभवता येऊ शकतो.
या आहेत उपाययोजना
कुलरसाठी नेहमी ‘थ्री-पिन’चा वापर करावा. त्यात पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करुन प्लग काढून ठेवावा. म्हणजे कुलरचा विजेशी संबंध राहणार नाही. पाणी भरताना ते टाकीच्या खाली सांडून जमिनीवर परसरणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी. त्यानंतर ‘प्लग पिन’ लाऊन स्वीच सुरू करावा. कुलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करु नका.