ग्रामीण भागातील प्रतिभा प्रकाशात आली
By Admin | Updated: September 27, 2015 00:15 IST2015-09-27T00:15:23+5:302015-09-27T00:15:23+5:30
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विद्यार्थिनींनी जिल्हा पातळीवर संपन्न झालेल्या विज्ञान प्रेरणा पुरस्कार ...

ग्रामीण भागातील प्रतिभा प्रकाशात आली
विज्ञान प्रेरणा पुरस्कार : सातेगाव, दहिगाव, विहिगाव, कापूसतळणीच्या मुलींची निवड
अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विद्यार्थिनींनी जिल्हा पातळीवर संपन्न झालेल्या विज्ञान प्रेरणा पुरस्कार प्रदर्शनीत आपल्या प्रतिभाशक्तीचे प्रदर्शन केले. तालुक्यातील ५५ प्रतिकृतींपैकी चार प्रतिकृतींच्या निवड राज्यस्तरावर आयोजित प्रदर्शनासाठी करण्यात आली. या चारही प्रतिकृती विद्यार्थिर्नंनी तयार केल्या होत्या, हे विशेष. यावरून विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनी अभ्यासासोबतच प्रतिभाशक्तीतही अव्वल आहेत, हे दिसून आले. पंचफुलाबाई हरणे विद्यालयाची विद्यार्थिनी व सातेगाव येथील श्यामली अंकुश बोबडे, निर्मला विद्यालय कापूसतळणीची कल्याणी उमेश बोंडे, महात्मा फुले विद्यालय, विहिगावची महिमा राजेंद्र गवई आणि इंदिरा गांधी विद्यालय, दहिगाव रेचा येथील वृषाली रवींद्र गव्हाळे या विद्यार्थिनींनी आपल्या वैज्ञानिक प्रतिकृतीचे गुरुनानक अभियांत्रिकी महाविद्यालय, कळमेश्वर (नागपूर) येथे प्रदर्शन केले.
पंचफुलाबाई हरणे विद्यालयाचे शिक्षक संजय शेळके यांनी श्यामली बोबडे या विद्यार्थिनीस मार्गदर्शन करून अपघातमुक्त रहदारीचा प्रकल्प तयार केला होता. निर्मला विद्यालय, कापूसतळणीचे शिक्षक एस.एम. रडके यांनी कल्याणी बोंडे या विद्यार्थिनीस मार्गदर्शन करून घरगुती एसी हा प्रकल्प तयार केला. महात्मा फुले विद्यालय, विहिगाव येथील शिक्षक अशोक मसने यांनी महिमा गवई हिला मार्गदर्शन करुन सौर बाबा गाडी हा प्रकल्प तयार केला. इंदिरा गांधी विद्यालय, दहिगाव रेचा येथील शिक्षक सूरज पटेल यांनी वृषाली गव्हाळे या विद्यार्थिनीस मार्गदर्शन करून वायूची गती मोजण्याचा प्रकल्प तयार केला होता.
प्रदर्शन सहभागातून अनेक शाळा वंचित
प्रत्येक शाळेला दरवर्षी जुलै महिन्यात या प्रदर्शनाच्या सहभागासाठी एक विशिष्ट रक्कम दिली जाते. काही शाळांना ही रक्कम प्राप्तच झाली नाही असाही एक आरोप झाला आहे. हा एक प्रशासकीय दिरंगाईचा भाग असला तरी ही रक्कम मागेपुढे कधीतरी भेटनेच आहे. मुद्दा प्रदर्शनातील सहभागाचा आहे व सहभाग शाळेच्या आणि संबंधीत शिक्षकांच्या सक्रियतेचा आहे. पदरमोड करुनही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना या संकल्पनेत सहभागी करुन घेऊ शकतात. शिकवणीच्या भरोश्यावर अतिरिक्त उत्पन्न मिळविणाऱ्या शिक्षकांनी या समस्येकडे लक्ष देऊन आपल्या शाळेचा सहभाग प्रदर्शनात केला असता तर विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा आनंद घेता आला असता.
३० पर्यंत आॅनलाईन नोंदणी
तालुक्यातील अनेक शाळा या प्रदर्शनीत सहभागी होऊ शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांची वैज्ञानिक संकल्पना पाठ करुन त्याचा आनंद विद्यार्थ्यांना देण्याचीही बहुमोल संधी या शाळांनी गमावली आहे. सोबतच विद्यार्थ्यांचेही नुकसान केले. यावर्षी ३० सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन नोेंदणी करून शाळा आपल्या विद्यार्थ्यांचे शोधप्रकल्प या योजनेत पाठवू शकतात.