लाचप्रकरणी आरटीआय कार्यकर्ता एसीबीच्या जाळ्यात, बीडीओ मात्र फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 18:29 IST2021-12-05T18:21:10+5:302021-12-05T18:29:48+5:30
घरकुल घोटाळा दडपण्यासाठी लाच मागणारा प्रभारी गटविकास अधिकारी व मध्यस्थाविरुद्ध एसीबीने शनिवारी गुन्हा दाखल केला. याची भनक लागताच प्रभारी बीडीओ फरार झाला. तर, मध्यस्थ असलेला आरटीआय कार्यकर्ता मात्र पोलिसांच्या तावडीत अडकला.

लाचप्रकरणी आरटीआय कार्यकर्ता एसीबीच्या जाळ्यात, बीडीओ मात्र फरार
अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल घोटाळा दडपण्यासाठी लाच मागणारा प्रभारी गटविकास अधिकारी व मध्यस्थाविरुद्ध एसीबीने शनिवारी गुन्हा दाखल केला. याची भनक लागताच प्रभारी बीडीओ फरार झाला. तर, मध्यस्थ असलेला आरटीआय कार्यकर्ता मात्र पोलिसांच्या तावडीत अडकला. ही कारवाई रविवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली.
अनंता उत्तमराव नागरगोजे (५३), रा. महागाव असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. तर, गौतम ठाकूर असे पसार झालेल्या प्रभारी बीडीओचे नाव आहे. तालुक्यातील मोहदी येथे घरकुलाची बोगस कामे झाल्याच्या प्रकरणात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई न करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम गौतम ठाकूर यांनी अनंता ऊर्फ संजय नागरगोजे याच्या मध्यस्थीने स्वीकारण्याची कबुली दिली होती. त्यावरून एसीबीने सापळा रचला.
शनिवारी नागरगोजे याने तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारली. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी सायंकाळी रात्री १२ वाजेपर्यंत एसीबी पथकाने नागरगोजे याच्या घराची झडती घेतली. रविवारी सकाळी त्याला ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट यांनी नागरगोजे याला ताब्यात घेतल्याचे पत्र त्याच्या पत्नीला दिले. याबाबीची भनक लागताच प्रभारी गटविकास अधिकारी गौतम ठाकूर पसार झाले आहे.
प्रभार ठरला वादग्रस्त
‘घरकुल घोटाळ्यातील भ्रष्टाचार दडपण्यासाठी प्रभारी राज’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. प्रभारी बीडीओ गौतम ठाकूर याच्यावर यापूर्वीच खातेनिहाय चौकशीमध्ये ठपका ठेवण्यात आला आहे. तरीही, येथील ‘ब’ दर्जाच्या अधिकाऱ्यांना डावलून जिल्हा परिषद सीईओंनी विस्तार अधिकारी असलेल्या गौतम ठाकूर यांना बीडीओचा प्रभार दिला. घरकुल घोटाळ्यामुळे एका लाभार्थ्याने पंचायत समिती जाळण्याचा प्रयत्नही काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतरही जिल्हा परिषद ‘शांत’ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.