रेती वाहतुकीवर धाडी
By Admin | Updated: December 6, 2014 22:37 IST2014-12-06T22:37:42+5:302014-12-06T22:37:42+5:30
‘वाळू तस्करी’ बाबतची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित करताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. शुक्रवारी रात्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू वाहतूक रोखण्यासाठी सापळा रचला.

रेती वाहतुकीवर धाडी
सात ट्रक पकडले : अखेर महसूल विभागाला आली जाग
अमरावती : ‘वाळू तस्करी’ बाबतची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित करताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. शुक्रवारी रात्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू वाहतूक रोखण्यासाठी सापळा रचला. अखेर सात ट्रक पकडण्यात महसूल कर्मचाऱ्यांना यश आले. महसूल विभागाच्या या कारवाईनंतर जिल्ह्यात बोकाळलेल्या निरंकुश वाळू वाहतुकीवर शिक्कामोर्तबच झाले आहे.
मध्यरात्री घालणार गस्त
नदी, नाल्यातून वाळू उपस्याला बंदी असताना दरदिवसाला सुमारे ५०० ट्रकद्वारे शहरात अर्वैध वाळू वाहतूक होत असल्याचे वास्तव आहे. मात्र हा प्रकार महसूल विभाग मूकपणे बघत होता. वाळू तस्करीत महसूल, पोलीस, आरटीओ अशी साखळी असल्यामुळे कारवाई करणार कोण? ही खरी बाब होती. परंतु जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची अवैध वाळू वाहतूक प्रकरणी कानउघाडणी करताच मागील दोन दिवसापासून वाळू तस्करीला रोखण्याचे पाऊल उचलल्या गेले आहे. शुक्रवारी रात्री चांदुर रेल्वे, छत्री तलाव मार्ग, वलगाव, भातकुली मार्गावर वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी विशेष पथकाने धाडसत्र राबविले. यात अवैधरित्या वाळू उपसा करुन ती वाळू विक्रीसाठी नेली जात असताना सात ट्रक पकडण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या ट्रक चालकांवर दंडात्मक कारवाई करणफयात आली आहे. उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे हे रात्रीला गस्त घालीत असून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना लगाम लावण्यासाठी ‘जागते रहो’ चे कर्तव्य बजावत आहेत. अवैधरित्या वाळू वाहतूक करुन लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार, हा सुद्धा खरा सवाल आहे.
परंतु अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी सरसावले आहेत. वाळू तस्करी रोखण्याचा हा शिरस्ता असाच सुरु राहिला तरच महसूल बुडण्यापासून वाचेल, अन्यथा दोन दिवस थातुरमातुर कारवाईचे सोंग दाखवून वाळू तस्करी रोखता येणार नाही, हे वास्तव आहे. महसूल विभागाने छोट्याशा रक्कमेसाठी कर्तव्य न विसरता वाळूमध्ये होत असलेल्या फसवणुकीचा लेखाजोखा बघितला तर त्यांच्या लक्षात येईल. वाळू तस्कर कोट्यधीश झाले असून हे सर्व महसूल, पोलीस आणि आरटीओंच्या मेहरबानीनेच सुरु आहे.