रस्त्यालगतच्या अतिक्रमणाला अभय

By Admin | Updated: March 14, 2016 00:08 IST2016-03-14T00:08:45+5:302016-03-14T00:08:45+5:30

पंचवटी, राधानगर ते पुढे गाडगेनगर रस्त्यावर अतिक्रमणाची घेराबंदी असताना अस्ताव्यस्त पार्किंगने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे.

Road to the encroachment | रस्त्यालगतच्या अतिक्रमणाला अभय

रस्त्यालगतच्या अतिक्रमणाला अभय

वाहतूक शाखेचे दुर्लक्ष : गाडगेनगर भागात वाहतुकीचा बोजवारा
अमरावती : पंचवटी, राधानगर ते पुढे गाडगेनगर रस्त्यावर अतिक्रमणाची घेराबंदी असताना अस्ताव्यस्त पार्किंगने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. हातगाड्यांच्या अतिक्रमणासह अन्य बेकायदेशीर पार्किंगला वाहतूक शाखेने अभय दिल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
पंचवटी सोडले की, पुढे गाडगेनगर, राठीनगरपर्यंत अतिक्रमणाचा विळखा अधिकाधिक घट्ट होतो. उड्डाण पुलाजवळ तर हातगाड्यांची स्पर्धा लागत असल्याने गाडगेबाबा मंदिर परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या उड्डाण पुलाखाली अवैध पार्किंगसह हातगाड्यांवर तत्सम वस्तू विकणाऱ्यांची भाऊगर्दी वाढली आहे.

पदपथावर फ्रूट मार्केट
गाडगेनगर भागात पदपथावर फ्रूट तथा भाजी मार्केट बनविण्यात आले आहे. चहाटपरी, चायनीज, गॅरेज, पेपर विक्रेते अशा लघु व्यावसायिकांची मांदियाळी आहे. या अतिक्रमणानेच हा भाग व्यापला आहे. परिणामी रस्ता अरुंद झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या अतिक्रमणासह अवैध वाहतुकीवर कारवाई न करता वाहतूक शाखेचे अधिकारी-कर्मचारी नेमके काय करतात, हे एक कोडेच आहे. उल्लेखनीय म्हणजे विशिष्ट भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांकडेच दंड वसूल करण्यासाठी चालान बुक देण्यात आल्या आहेत. गाडगेनगर भागाचा त्यात समावेश नाही. त्यामुळे वाहतूक नियंत्रित करण्यासह अन्य अतिक्रमणावर हातोडा फिरविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे वेळ आहेच. अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी डीसीपी नितीन पवार यांन स्वीकारली होती. मात्र, अंमलबजावणी होताना दिसत नाही. रस्त्यावरील अतिक्रमण हटवून या रस्त्याला मोकळा श्वास घेऊ द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

व्यावसायिक संकुलाकडून पार्किंग गिळंकृत
गाडगेबाबा मंदिरालगतच्या पदपथावर व्यावसायिकांनी प्रचंड अतिक्रमण केले आहे. पायी चालणेही दुरापास्त आहे. व्यावसायिक संकुलांना स्वत:ची पार्किंग व्यवस्था नसल्याने सार्वजनिक जागेवर चारचाकींसह दुचाकींच्या रांगा लागतात. वाढते अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत.महापालिकेसह वाहतूक शाखेने अतिक्रमण हटवावे, अशी अपेक्षा येथील नागरिकांना आहे.

Web Title: Road to the encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.