भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला, खोड माशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST2021-09-09T04:18:06+5:302021-09-09T04:18:06+5:30
अमरावती/ संदीप मानकर : सोयाबीनला १० हजारांचा भाव काय मिळाला, त्याकारणाने जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा पेरा वाढला. मात्र, आता पिकांवर ...

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला, खोड माशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव
अमरावती/ संदीप मानकर
: सोयाबीनला १० हजारांचा भाव काय मिळाला, त्याकारणाने जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा पेरा वाढला. मात्र, आता पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होत असून, भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा सुद्धा वाढला. परंतु, खोड माशी, चक्रीभुंगा व पाने खाणारी अळी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच जुलै ते ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडल्याने यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
यंदा सोयाबीनला सरासरी चार हजारांचे भाव मिळाले. मात्र, वर्षअखेरीस चार दिवस फक्त सोयाबीनला १० हजारांपर्यंत प्रति क्विंटलचा विक्रमी भाव नोंदविला गेला. यंदाही चांगला भाव मिळेल, या आशेने २०२१-२२ च्या नियोजनानुसार २ लाख ६२ हजार ८८३ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला. काही तालुक्यांत खोड माशी, चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव व पाने खाणाऱ्या अळीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोयाबीनचा पेरा (हेक्टरमध्ये) सरासरी मिळालेला भाव (रुपयात)
वर्ष
२०१६-१७ - २,९१,२४७ २,९६६
२०१७- १८- २,८७,०७३ २,९२०
२०१८- १९- २,९१,६४२ ३,१५४
२०१९-२०- २,३८,७२६ ३,५५२
२०२०-२१ - २,७९,६५९ ३,९२५
२०२१-२२ - २,६२,८८३ ४०००
बॉक्स :
खोड माशीचा खोडा
जिल्ह्यात मिलीबगचा प्रादुर्भाव नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. काही तालुक्यांत सोयाबीनवर खोड माशी, चक्रीभुंगा व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे.
बॉक्स :
जुलै, ऑगस्टमध्ये पावसाची दडी
जुुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करून काळजी घेतली. मात्र, आता जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. पावसाच्या खंडामुळे फुले गळणे, बारीक शेंगा गळणे यामुळे त्याचा सोयाबीन पिकावर परिणाम झाला.
कोट
यंदा सोयाबीनचा पेरा चांगला आहे. जुलै व ऑगस्ट पावसाचा खंड पडला त्याकारणाने पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होईलच. आता काही तालुक्यांत खोडमाशी, चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आहे. शेतकऱ्यांनी योग्य वेळी फवारणी करून काळजी घेतली आहे.
अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कोट
बाजार व्यवस्थेप्रमाणे यंदा सोयबीनला रास्त भाव मिळेल. यंदा उत्पादन खर्चसुद्धा निघेल, अशी स्थिती असल्याने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला.
अरविंद नळकांडे, शेतकरी नेते