अंगणवाडीत रंगला उंदीर-नागिणीचा खेळ

By Admin | Updated: September 17, 2016 00:28 IST2016-09-17T00:28:20+5:302016-09-17T00:28:20+5:30

मेळघाटातील शाळा व अंगणवाडी केंद्राच्या इमारती वेळेपूर्वीच जिर्ण होत असल्याने त्यामध्ये साप, उंदीर, घुशी आदी सरपटणारे प्राणी निघत असल्याचे नित्याचे झाले आहे.

Ringtones on the anganwadi | अंगणवाडीत रंगला उंदीर-नागिणीचा खेळ

अंगणवाडीत रंगला उंदीर-नागिणीचा खेळ

चिमुकल्यांमध्ये दहशत : मेळघाटच्या कालापाणी येथील घटना
नरेंद्र जावरे  परतवाडा
मेळघाटातील शाळा व अंगणवाडी केंद्राच्या इमारती वेळेपूर्वीच जिर्ण होत असल्याने त्यामध्ये साप, उंदीर, घुशी आदी सरपटणारे प्राणी निघत असल्याचे नित्याचे झाले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता चिखलदरा तालुक्याच्या कालापाणी गावातील अंगणवाडी केंद्रात नागिण आणि उंदीराचा खेळ अर्धा तास रंगला.
चिखलदरा तालुक्यातील कालापाणी गावात अंगणवाडी केंद्रात नेहमीप्रमाणे मुले उसळ, खिचडीसह बडबड गिते आणि खेळण्यासाठी आली होती. अंगणवाडी सेविका पार्वती भुसूम पोषण आहाराच्या कामात व्यस्त असताना अचानक चिमुकल्या मुलांचा अंगणवाडी केंद्रात हलकल्लोळ माजला.
जीवाच्या आतंकाने धावत सुटलेला उंदीर त्याचा पाठलाग करीत असलेली नागिण आणि त्यामागे ओरडत सुटलेली मुले, असा काहीसा हा क्षण होता. विद्यार्थ्यांचा गलबला ऐकून अंगणवाडी सेविका पार्वती भुसूम तेथे पोहचल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी क्षणाचा विलंब न करता त्या नागिणला काठ्यांनी मारुन ठार केले. गावकऱ्यांपुढेच नागिणीने शेवटच्या प्रयत्नात उंदीराला तोंडात पकडण्यात यश मिळविले होते. मात्र दुसऱ्याच क्षणात तोंडात उंदराची पकडलेली शिकार पोटात जाण्यापूर्वीच त्याला जीव गमवावा लागला.
आदिवासींमध्ये संताप
अंगणवाडी केंद्राची नवीन इमारत दोन वर्षापूर्वीच नवीन बांधण्यात आली. मात्र निकृष्ठ कामामुळे ती वेळेपूर्वीच जिर्ण झाली. यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी दिल्या. मात्र प्रशासनाच्या कमिशनखोर वृत्तीमुळे त्यांचा आवाज दाबण्यात आल्याचे नामदेव धांडे, अनिल बेलसरे, रामलाल धांडे, पुंडलिक सुरले, विलास, विजय बेलसरे, विनोद भुसूम, विकास झाडखंडे, प्रवीण बेलसरे आदी संतप्त आदिवासींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बदनापुरची पुनरावृत्ती
गत महिन्यात बदनापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात चक्क नागराजाने दर्शन दिले होते. त्यानंतर सुद्धा अंगणवाडी आणि शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत.
धान्यामुळे उंदीर-सापांचा सुळसुळाट
कालापाणी अंगणवाडी केंद्राचा परिसर स्वच्छ नव्हता तर इमारतीला ठिकठिकाणी छिद्र पडलेली होती. दुसरीकडे अंगणवाडी केंद्रामध्ये चवळी, मटकीसह उसळ, खिचडीचा तांदूळ आदी धान्यसाठा ठेवण्यात येतो त्यासाठी उंदराचा शिरकाव आणि उंदराची शिकार करून सापांचे राज्य अशी अन्नसाखळी मेळघाटातील चिमुकल्यासाठी जिवघेणी ठरली आहे. चिखलदरा आणि धारणी अशा दोन्ही तालुक्यातील आश्रम शाळा आणि वसतीगृहांची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात कालापाणीच सारखीच आहे.

Web Title: Ringtones on the anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.