क्रांतिदिनी गनिमी कावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:39 IST2018-08-06T22:38:42+5:302018-08-06T22:39:15+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी होणारा ९ आॅगस्टचा जिल्हा बंद हा शांततेच्या मार्गाने, परंतु गनिमी काव्याने होणार आहे. या आंदोलनाचे आवाहन करण्यासाठी ८ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता शहरातून रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजबांधवांनी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

क्रांतिदिनी गनिमी कावा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी होणारा ९ आॅगस्टचा जिल्हा बंद हा शांततेच्या मार्गाने, परंतु गनिमी काव्याने होणार आहे. या आंदोलनाचे आवाहन करण्यासाठी ८ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता शहरातून रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजबांधवांनी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
शासनाने मराठा समाजाच्या सर्व मागण्या विनाविलंब मान्य कराव्यात, अशी आमची मागणी असताना राज्य शासनाद्वारा दिरंगाईचे धोरण आहे. केवळ तारखांवर तारखा देऊन मराठा समाजाची दिशाभूल करण्यात येत आहे. यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे रूपांतर मराठा ठोक मोर्चात झाले आहे. २२ सप्टेंबर २०१६ ला मराठा समाजाद्वारा अमरावतीला अभूतपूर्व असा मूक मोर्चा काढण्यात आला. राज्यभरात दोन वर्षांत असे ५८ मोर्चे निघाले; परंतु याची परिणती शून्य आहे. त्यामुळेच वरिष्ठांच्या आदेशानुसार अमरावती व बडनेरात ८९ आॅगस्टला क्रांतिदिनी बंद पाळण्यात येणार आहे. यावेळी शाळा- महाविद्यालयांसह एसटी बस सेवा, शहर बस सेवेसह बाजारपेठा बंद राहणार आहेत. तालुका पातळीवरील बंद संदर्भातील नियोजन पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रत्येक ठिकाणी ग्रुपमध्ये मराठा बांधव सहभागी होतील. गनिमी काव्याने सर्वत्र बैठकी सुरू आहेत. आंदोलनही गनिमी काव्यानेच होईल. मात्र, गनिमी कावा कशाप्रकारचा राहणार, यावर आयोजकांनी बोलण्यास नकार दिला.
आपापल्या परिसरात मराठा बांधवांनी शांततेच्या मार्गाने बंदचे आवाहन करावे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता बाळगावी. अमरावतीला राजकमल चौकात ठिय्या देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन, सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
जिल्हा बंददरम्यान रुग्णालय, औषधी केंद्र, अॅम्ब्यूलन्स सेवा, दूध सेवा, फायर बिग्रेड या अत्यवश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. ९ आॅगस्टला सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, ठोक व चिल्लर दुकाने, सर्व प्रकारची वाहतूक सेवा, एसटी बससेवा, शाळांच्या व्हॅन, आॅटो, मिनीबस, महापालिकेची बस वाहतूक सेवा तसेच सर्व शाळा व महाविद्यालये तसेच शिकवणी वर्ग बंद राहणार आहेत.
बुधवारी शहरात मोटारबाईक रॅली
जिल्हा बंदच्या जागृतीसाठी व बंदचे आवाहन करण्यासाठी ८ आॅगस्टला मोटरबाइक रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता ही रॅली राजापेठवरून सुरू होईल. राजकमल चौक, जयस्तंभ, इर्विन चौक, पंचवटी शेगाव नाका, नवीन कॉटन मार्केट रोड, रामलक्ष्मण संकुल, बाबा रेस्टॉरंट मार्गे इर्विन चौक, रेल्वे स्टेशन चौक येथे समारोप करण्यात येणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.