परतीचा पाऊस सोयाबीन, कपाशीच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:00 AM2020-09-30T05:00:00+5:302020-09-30T05:00:31+5:30

प्रशासनात १ जूनपासून पावसाची नियमित नोंद घ्यायला सुरुवात होते. ती नोंद ३० सप्टेंबरपर्यत सुरू असते व त्यानंतर येणारा परतीचा पाऊस हा अवकाळी प्रकारात गणला जातो. परतीचा पाऊस हा याच सुमारास सुरू होतो. यावर्षीदेखील परतीचा पाऊस सुरू झाल्याबाबत हवामान विभागात मतभिन्नता असली तरी जिल्हा प्रशासनात मात्र परतीचा पाऊसच गृहीत धरला जात आहे.

Return rain soybean, cotton roots | परतीचा पाऊस सोयाबीन, कपाशीच्या मुळावर

परतीचा पाऊस सोयाबीन, कपाशीच्या मुळावर

Next
ठळक मुद्देहंगाम बाधित : शेंगांना कोंब, पिकांचे सरासरी ७५ टक्के नुकसान, हंगामात शेतकऱ्यांच्या घरी पीक नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोयाबीन सवंगणीचा हंगाम सुरू होताच परतीच्या पावसालाही सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटायला लागले आहेत. भारी जमिनीतील कपाशीची बोंडगळ सुरू झाली आहे. दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.
प्रशासनात १ जूनपासून पावसाची नियमित नोंद घ्यायला सुरुवात होते. ती नोंद ३० सप्टेंबरपर्यत सुरू असते व त्यानंतर येणारा परतीचा पाऊस हा अवकाळी प्रकारात गणला जातो. परतीचा पाऊस हा याच सुमारास सुरू होतो. यावर्षीदेखील परतीचा पाऊस सुरू झाल्याबाबत हवामान विभागात मतभिन्नता असली तरी जिल्हा प्रशासनात मात्र परतीचा पाऊसच गृहीत धरला जात आहे. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने लावलेली रिपरिप सप्टेंबर संपत असतानाही सुरू आहे. रोज कुठे ना कुठे पावसाची नोंद होत आहे. सतत ढगाळ वातावरण व पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. पेरणीच्या काळात गायब झाल्यानंतर पावसाने धरलेला जोर अद्यापही संपलेला नाही.
पावसात मूग, उडीद ही पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली. आता सोयाबीनचा हंगाम सुरू होतो. मात्र, सततच्या पावसामुळे काप्लेक्स स्थिती निर्माण झालेली आहे. मुळकूज, खोडकुज, चक्रीभुंगा, मोझॅक आदींमुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात किमान ५० ते ६० टक्के घट झाली आहे. सवंगणीच्या काळातदेखील पाऊस पिच्छा सोडत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. जमिनीत आर्द्रता असल्याने कापणी करता येत नाही. अशा विपरीत परिस्थितीत शेंगाना कोंब फुटायला लागले आहेत. नगदी पीक या अर्थाने शेतकरी सोयाबीन पेरतात. यंदा तीन लाख हेक्टरपैकी ७५ टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

कपाशीवर बोंडअळी अन् बोंडगळ
मूग, उडिदापाठोपाठ सोयाबीनही हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आशा कपाशीवर आहेत. मात्र, बहुतांश भागातील कपाशीवर यंदाही गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्याने बुरशीजन्य रोग व ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पावसामुळे कपाशीची बोंडे काळी पडून गळ व्हायला लागली आहे. शेतकऱ्यांना फवारणीला पुरेसा अवधी या प्रतिकूल वातावरणामुळे मिळालेला नसल्याने यंदा कपाशीचेही पीक हातचे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

मेळघाट माघारले, जिल्ह्यात सरासरी पार
जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत ७४९.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा ७७९.६ मिमी पाऊस झाला आहे. ही टक्केवारी १०५ आहे. धामणगाव रेल्वेसह चिखलदरा व धारणी तालुके वगळता उर्वरित ११ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी पार केली आहे. यामध्ये अमरावती ११० टक्के, भातकुली १२१, नांदगाव खंडेश्वर १२५, चांदूर रेल्वे १०९, तिवसा १११, मोर्शी १२२, वरूड १२६, दर्यापूर १४३, अंजनगाव सुर्जी १३१, अचलपूर ८६, चांदूर बाजार १३०, धामणगाव रेल्वे ८७, चिखलदरा ५८ व धारणी तालुक्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला.

Web Title: Return rain soybean, cotton roots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.