जिल्ह्यातील जलाशयांवर आलेल्या स्थलांतरीत पक्ष्यांचा परतीचा प्रवास
By Admin | Updated: March 18, 2015 00:25 IST2015-03-18T00:25:27+5:302015-03-18T00:25:27+5:30
हिवाळ्यात देशविदेशातून स्थंलातरण करुन आलेल्या पक्षांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. विविध पक्षांचे थवेच्या थवे मायदेशी परत जाताना दिसून येत आहे.

जिल्ह्यातील जलाशयांवर आलेल्या स्थलांतरीत पक्ष्यांचा परतीचा प्रवास
वैभव बाबरेकर अमरावती
हिवाळ्यात देशविदेशातून स्थंलातरण करुन आलेल्या पक्षांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. विविध पक्षांचे थवेच्या थवे मायदेशी परत जाताना दिसून येत आहे. तलावावरील प्रदुषित वातावरण व मानवी हस्तक्षेपामुळे स्थंलातरीत पक्षांची संख्या यंदा रोडावल्याने वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
हिवाळ्यातील बोचऱ्या थंडीच्या दिवसात अनेक विदेशी पक्षी महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतातील नद्या, तलाव व इतर पाणथळीची वास्तव्यास असतात. जंगलातील वृक्षावर किलबिलाट करीत ते त्यांच्या अस्तित्वाची जाणिव करुन देतात. मात्र आता स्थंलातरीत पक्षांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे, मार्च महिन्याच्या मध्यावधीत सर्व स्थलांतरित पक्षी आपआपल्या ठिकाणी परत जाताना आढळून येत आहे. जिल्ह्यातील विविध तलावावरुन परत मायदेशी जाताना पुन्हा हजारो किलोमीटर प्रवास ते करणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी पोटभर अन्न खाऊन ते प्रवासाला लागले आहे. जणू काही आम्ही जातो अमुच्या गावा, आमचा निरोप घ्यावा. जिल्ह्यातील जलाशयावर आलेल्या पक्षांचे स्थलांतरण प्रदुषण व मासेमारीमुळे धोक्यात आले आहे. मात्र तरीही या सगळ्या धोक्यांचा सामना करीत पक्षांची रेलचेल यंदा पाहायला मिळाली आहे. तीच रेलचेल पुढील वर्षी पाहायला मिळेल, अशी आशा पक्षीमित्रामध्ये आहे.
पक्षी राखतात निसर्गाचे संतुलन
निसर्ग संतुलनात पक्षी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. विदेशातील हे पाहुणे पाण्यातील, हवेतील व वनस्पतीवरील असंख्य किटक खातात. पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. निसर्गाचे सफाई कामगार, उत्तम बीजप्रसारक व शेतकऱ्यांचे मित्र अशी त्यांची पर्यावरण संतुलनात त्यांची प्रभावी भूमिका आहे.
पक्ष्यांचा हजारो किलोमिटरचा प्रवास
मंगोलियामधून येणारे राजहंस तर तब्बल ४,३०० किमीचा प्रवास करून अमरावतीत येतात. काही पक्षी तर २० हजार ते ५४ हजार कि.मि. पर्यंतचा प्रवास करतात. पक्षी हे साधारणत: ताशी ४० ते ६० कि.मी. वेगाने उडतात. क्रौंच पक्षी दिवसाला सरसरी २४० की.मी. प्रवास करतात. स्थलांतरित पक्षी हे आठ ते दहा हजार फूट उंचीपर्यंत उडू शकतात. स्थलातरणा दरम्यान पक्षी दिवसा व रात्रीही प्रवास करतात. हिमालयाकडून केरळ भागात म्हणजेच पक्ष्यांचे स्थलांतर हे देशांतर्गतही असते. काही आर्टिक्ट ते अंटार्टीक म्हणजे देशाबाहेरूनही आपल्याकडे येतात. सायबेरियामधून येणारे क्रौंच व साधा करकोचा, मंगोलियावरून येणारा राजहंस किंवा पट्ट कदंब ही त्यातलीच काही उदाहरणे आहेत.
पक्षी मित्रांमध्ये कुतूहल
स्थंलातरीत पक्षांच्या हालचाली टिपण्याचा छंदातून पक्षीपे्रमी अभ्यासात्मक दृष्टीकोन ठेवतात. पक्ष्यांचा अभ्यास व निरीक्षणे करण्यासाठी, त्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी त्यांची वाटच पाहत असतात. पर्यायाने यांच्यातही निसर्गाप्रती संवेदना व प्रेम निर्माण होते. आज विविध ठिकाणी निसर्ग वाचविण्यात ते आपले आयुष्य खर्ची घालताहेत. असे मत वन्यजीव अभ्यासक यादव तरटे व स्वप्नील रायपूरे यांनी व्यक्त आहे.