केंद्र पुरस्कृत कृषी योजनांची होणार पुनर्रचना
By Admin | Updated: May 19, 2014 22:59 IST2014-05-19T22:59:07+5:302014-05-19T22:59:07+5:30
हवामानातील बदलत्या वातावरणाशी सुसंगत नवीन कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्यासह देशभरात शाश्वत शेती अभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने शेवटच्या टप्प्यात मंजूर केला आहे.

केंद्र पुरस्कृत कृषी योजनांची होणार पुनर्रचना
अमरावती : हवामानातील बदलत्या वातावरणाशी सुसंगत नवीन कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्यासह देशभरात शाश्वत शेती अभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने शेवटच्या टप्प्यात मंजूर केला आहे. या निर्णयानुसार केंद्र पुरस्कृत योजना एकत्रितपणे राबविल्या जाणार आहेत. यासाठी राज्य व जिल्हास्तरावर विविध समित्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान सक्षम करण्याचा उद्देश आहे. सन २0१४-१५ पासून मावळत्या केंद्र शासनाने शेतीशी संबंधित विविध योजनांची पुनर्रचना केली. यापैकी काही योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय सुक्ष्म सिंचन अभियान, राष्ट्रीय सेंद्रीय शेती प्रकल्प, राष्ट्रीय मृदा आरोग्य व सुपिकता व्यवस्थापन प्रकल्प आणि कोरडवाहू शाश्वत शेती कार्यक्रमाचा समावेश आहे. योजनांच्या माध्यमातून हवामान बदलांशी सुसंगत कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान राबविण्यात येईल. अभियानाच्या माध्यमातून कोरडवाहू क्षेत्रविकास, शेती, जलव्यवस्थापन, मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि वातावरण बदल व शाश्वत शेती संनियंत्रण या घटकांचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य आणि जिल्हास्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार राज्य शासनस्तरावर राज्यस्तरीय समिती, राज्यस्तरीय स्थायी तांत्रिक समिती, जिल्हास्तरीय अभियान समिती, राज्यस्तरीय तांत्रिक सहायता चमू नियुक्त समिती आणि जिल्हास्तरावर विषय विशेषज्ञ नियुक्ती समिती स्थापन करणे प्रस्तावित होते. राज्य शासनाने यासंदर्भात एका निर्णयाद्वारे नुकतीच या समित्यांची घोषणा केली आहे. (प्रतिनिधी)