आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीला स्थगिती
By Admin | Updated: July 8, 2014 23:14 IST2014-07-08T23:14:13+5:302014-07-08T23:14:13+5:30
राज्य शासनाने नुकतेच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या आरक्षणाच्या निर्णयामुळे मात्र जिल्हा परिषदेत चालू जुलै महिन्यात नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार होती.

आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीला स्थगिती
अमरावती : राज्य शासनाने नुकतेच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या आरक्षणाच्या निर्णयामुळे मात्र जिल्हा परिषदेत चालू जुलै महिन्यात नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र या आरक्षणाचे धोरण स्पष्ट झाले नसल्याने नव्या आरक्षणाच्यानुसार नोकरभरती करण्याचे धोरण ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच जिल्हा परिषदांची जुलै महिन्यात होणारी नोकरभरती शासनाने काही दिवस स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या विविध पदांसाठी येत्या काही दिवसात नोकरभरती घेण्याबाबत शासनाने आदेश काढले होते. या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने चौदाही विभागातील रिक्त असलेली विविध पदे भरण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाकडून माहितीही मागितली होती. ही माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाली होती. यानुसार आरक्षणाच्या आधारित वर्गवारीनुसार नोकरभरतीची प्रशासकीय प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती. या नोकरभरतीबाबत जाहिरात काढून उमेदवारांकडून रितसर अर्जही मागवितले जाणार होते. विशेष म्हणजे जुलै महिन्यातच जिल्हा परिषदेची ही नोकरभरती लेखी परीक्षेद्वारे पूर्ण करण्याचीही राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या आदेशात म्हटले होते. मात्र राज्य शासनाने नुकतेच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण लागू केल्यामुळे या नव्या आरक्षणाच्या निर्णयानुसार नोकरभरतीत सदर प्रवर्गाचे आरक्षण समाविष्ट करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर पूर्ण होणे अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये होत असलेली नोकरभरती नव्या आरक्षणाच्या निर्णयामुळे तूर्तास स्थगित करण्याबाबतचे लेखी आदेश सर्वच जिल्हा परिषदांना ५ जुलै रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेची ही नोकरभरती स्थगित करण्यात आली असून शासनाच्या पुढील आदेशापर्यंत नोकरभरती होणार नाही. (प्रतिनिधी)