बालरोग विभागप्रमुख राजेंद्र निस्तानेंचे बयाण नोंदविले
By Admin | Updated: June 10, 2017 00:06 IST2017-06-10T00:06:26+5:302017-06-10T00:06:26+5:30
पीडीएमसीत झालेल्या तीन नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणात गुरूवारी बालरोग विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र निस्ताने यांचे बयाण गाडगेनगर पोलिसांनी नोंदविले.

बालरोग विभागप्रमुख राजेंद्र निस्तानेंचे बयाण नोंदविले
अमरावती : पीडीएमसीत झालेल्या तीन नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणात गुरूवारी बालरोग विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र निस्ताने यांचे बयाण गाडगेनगर पोलिसांनी नोंदविले. घटनेच्या दिवशी आपण बाहेरगावी असल्याचे त्यांनी बयाणात म्हटले आहे. मात्र, एनआयसीयूची सर्वस्वी जबाबदारी सांभाळणारे निस्ताने यांच्या अधिनस्थ यंत्रणेच्या चुकीमुळे शिशुंचे मृत्यू झाले असून त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे का दाखल होऊ नयेत, असा सवाल मृत शिशुंचे नातेवाईक उपस्थित करीत आहेत. पीडीएमसीतील एनआयसीयूच्या बालरोग विभागाची जबाबदारी सांभाळणारे डॉ. राजेंद्र निस्ताने घटनेच्या वेळी अनधिकृतपणे रजेवर गेले होते.
या कारणास्तव पीडीएमसीचे अधिष्ठाता राजेंद्र जाणे यांनी निस्ताने यांच्या निलंबनाचे आदेश काढले. मृत शिशुंच्या नातलंगानी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करीत डीन राजेंद्र जाणे, डॉ.राजेंद्र निस्ताने, डॉ. पंकज बारब्दे व डॉ. प्रतिभा काळे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी रेटून धरली. मात्र, अद्याप त्यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलीस चौकशीचा भाग म्हणून पोलिसांनी राजेंद्र निस्तानेंना ठाण्यात बोलविले होते. मात्र, ते बाहेरगावी असल्यामुळे पोलिसांसमक्ष उपस्थित राहू शकले नाही. गुरूवारी निस्ताने यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात येऊन बयाण दिले. २८ मे रोजीच ते जम्मू-काश्मिरकरीता रवाना झाल्याचे त्यांनी बयाणात म्हटल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. निस्तानेंचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष याप्रकरणात सहभाग आहे किंवा नाही, ही बाब पोलीस तपासून पाहात असून चौकशीअंती पुढील कारवाईचे संकेत आहे.