व्यसनमुक्तीचे वचन देताच पहिल्या पतीशी पुनर्विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST2021-09-22T04:14:30+5:302021-09-22T04:14:30+5:30

दाम्पत्य आले पुन्हा एकत्र, २० वर्षांपासून मद्यपानाला कंटाळून सोडले होते सासर वनोजा बाग (अमरावती) : पतीला मद्यपानाचे व्यसन जडल्याने ...

Remarriage to first husband as soon as promise of detoxification | व्यसनमुक्तीचे वचन देताच पहिल्या पतीशी पुनर्विवाह

व्यसनमुक्तीचे वचन देताच पहिल्या पतीशी पुनर्विवाह

दाम्पत्य आले पुन्हा एकत्र, २० वर्षांपासून मद्यपानाला कंटाळून सोडले होते सासर वनोजा बाग (अमरावती) : पतीला मद्यपानाचे व्यसन जडल्याने महिलेने घटस्फोट घेतला. त्यानंतर दुसरा पतीदेखील मद्यपी निघाल्याने ती माहेरीच जीवन कंठत होती. तब्बल २० वर्षांनंतर पहिला पती आला. त्याने व्यसनमुक्तीचे वचन दिले आणि पती-पत्नी एकत्र आले. वीस वर्षानंतर त्यांचा पुनर्विवाह थाटात पार पडला. अंजनगाव सुर्जी (जि. अमरावती) तालुक्यातील मुऱ्हा गावात शनिवारी सायंकाळी पार पडलेला हा विवाह सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुऱ्हा येथील श्यामराव मोरे यांची मुलगी सुगंधा यांचा विवाह २० वर्षांपूर्वी लाखपुरी (ता. मूर्तिजापूर) येथील संतोष जामनिक (४७) यांच्याशी झाला होता. सात वर्षे संसार सुरळीत चालला. यानंतर संतोषला दारूचे व्यसन जडल्याने दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. त्यामुळे सुगंधा पतीला सोडून माहेरी आली. तेथून दोन वर्षांनंतर सुगंधाचे दुसरीकडे लग्न झाले. पण, दुसरा पतीदेखील दारूडा होता. नशेत मारहाण करत असल्याने सुगंधा परत माहेरी निघून आली. त्यानंतर आई-वडिलांच्या घरी राहून शेतीची कामे ती करू लागली. सुगंधाला अपत्य नाही, तर दुसरीकडे सुगंधाचा पहिला पती संतोष जामनिक हा वीस वर्षांपासून पत्नीविना होता.

वीस वर्षांनंतर संतोष हा सुगंधाच्या आई-वडिलांच्या भेटीसाठी आला. त्याने सुगंधासोबत पुनर्विवाह करण्याची इच्छा तिच्या आई-वडिलांकडे बोलून दाखविली. आता मद्यपान करणार नाही, असे त्यांना वचन दिले. त्यामुळे सुगंधासह तिच्या आईवडिलांनी या पुनर्विवाहाला होकार दिला. पुनर्विवाह शनिवारी सायंकाळी मुऱ्हा येथील बुद्धविहारात पार पडला. बौद्ध परंपरेनुसार भिक्खूंच्या हस्ते हा पुनर्विवाह पार पडला. यावेळी आशीर्वाद देण्यासाठी गावातील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते.

Web Title: Remarriage to first husband as soon as promise of detoxification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.