तीन आरएफओंना रुजू करून घेण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:26 IST2025-07-09T15:25:34+5:302025-07-09T15:26:19+5:30

Amravati : शासन आदेशाची पायमल्ली, आयएफएस यांचा मनमानी कारभार केव्हा थांबणार?

Reluctance to recruit three RFOs | तीन आरएफओंना रुजू करून घेण्यास टाळाटाळ

Reluctance to recruit three RFOs

गणेश वासनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
राज्य शासनाच्या बदली आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (आरएफओ) बदल्या करण्यात आल्या. मात्र, काही ठिकाणी आरएफओंना अद्यापही रुजू करून घेण्यात आलेले नाही. आरएफओंनी एकतर्फी पदभार स्वीकारत कारभार सुरू केला असला तरी उपवनसंरक्षकांना ते मान्य नाही. त्यामुळे आरएफओ विरुद्ध उपवनसंरक्षक असा संघर्ष उभा ठाकला आहे.


शासनाच्या वन व महसूल विभागाने ३० मे रोजीच्या बदली आदेशानुसार मंगेश पाटील (भोकर प्रादेशिक), गणेश शेवाळे (नांदेड प्रादेशिक), रामराव देवकते (देगलूर प्रादेशिक) यांची पदस्थापना होऊन महिनाभरापेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र, नांदेड वन विभागाच्या उपवनसंरक्षकांनी या तिघांना अद्यापही रुजू करून घेतलेले नाही. आरएफओ आर. एस. देवकते यांनी देगलूर वनपरिक्षेत्राचा एकतर्फी कार्यभार घेतल्यानंतर २३ जून २०२५ रोजी नांदेड उपवनसंरक्षकांना पत्राद्वारे कळविले होते. एवढेच नव्हे तर या संदर्भातील माहिती शासनाच्या कार्यासन अधिकाऱ्यांना पाठविली होती. असे असताना नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक बदलीने पदस्थापना झालेल्या या तीनही आरएफओंना रुजू करून घेण्यास नकार देत असल्याची माहिती आहे.


"नांदेड वन विभागात बदलीनंतरही आरएफओंना रुजू का करून घेतले जात नाही? याविषयी त्वरेने माहिती जाणून घेतो. लवकरच या संदर्भात तोडगा काढून शासन आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही."
- ऋषिकेश रंजन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामान्य प्रशासन)

Web Title: Reluctance to recruit three RFOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.