रेखी रेडवा पक्ष्याची विदर्भात पहिल्यांदा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:03 IST2018-10-04T16:58:15+5:302018-10-04T17:03:02+5:30

रेखी रेडवा पक्ष्याची विदर्भात पहिल्यांदा नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात पसरलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात ३ आॅक्टोबर रोजी पक्षिनिरीक्षण करीत असताना अमरावतीचे शुभम गिरी आणि पल्लवी अरोरा या पक्षिअभ्यासकांना रेखी रेडवा हा दुर्मीळ पक्षी आढळून आला.
रेखी रेडवाचे शास्त्रीय नाव स्ट्रायोलेटेड बंटिंग आहे. हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो. नरचा माथा राखट पांढरा, त्यावर काळसर रेषा, डोळ्यामागे काळसर पट्टा, डोक्यावरील भाग तपकिरी व त्यावर गर्द रेषा असतात. पंख तांबूस, कंठ व छाती राखट पांढरी आणि त्यावर काळ्या रेषा, पोट पिवळसर असते. मादी दिसायला नरासारखीच; मात्र डोके व कंठ तपकिरी रंगाचे असून, त्यावर गर्द रेषा असतात. हा पक्षी स्थलांतर करणारा असून पाकिस्तानातील बलुचिस्तान, सिंध, पंजाब तसेच भारताचा पूर्व व दक्षिण भाग आणि मध्य महाराष्ट्रात आढळून येतो. या पक्ष्यांचे वास्तव्य झुडपी डोंगर प्रदेशात असतात. या पक्ष्याची विदर्भात गुरुवारी प्रथमच नोंद झाली.
अकोला येथील पक्षिअभ्यासक शिशिर शेंदोकार हा रेखी रेडवा असल्याची पुष्टी यांनी केली तसेच या पक्ष्याची विदर्भातील ही पहिली नोंद असल्याचे पक्षिअभ्यासक किरण मोरे यांनी सांगितले.