नोंदणी नांदगावात, कापूस विक्री अमरावतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:28 IST2020-12-13T04:28:57+5:302020-12-13T04:28:57+5:30
पान २ चे लिड बातमी नांदगाव खंडेश्वर : पणन महासंघाच्या शासकीय कापूस खरेदीसाठी येथील कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची ...

नोंदणी नांदगावात, कापूस विक्री अमरावतीत
पान २ चे लिड बातमी
नांदगाव खंडेश्वर : पणन महासंघाच्या शासकीय कापूस खरेदीसाठी येथील कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ३ डिसेंबरपासून आतापर्यंत एकूण ४२६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. कापूस विक्रीसाठी नोंदणी जरी येथील बाजार समितीमध्ये झाली असली तरी शेतकऱ्यांना त्यांचा कापूस विकण्यासाठी अमरावती येथील बाजार समितीत न्यावा लागणार आहे. या निर्णयावर शेतकऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, आजी-माजी आमदारांनी राज्यस्तरावर पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
सोयाबीनने हात दाखविल्यानंतर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची मदार केवळ कापसावर होती. त्यातही कपाशीवर बोेंडअळी व बोंडसड आल्याने अपेक्षित उत्पन्न झाले नाही. त्यातही जे आले, ते हमीभावाने विकून पुढील हंगामाची तजवीज करण्यासाठी शेतकरी सरसावला. मात्र, आता कापसाची ऑनलाईन नोंदणी नांदगावात करायची, त्यासाठी दस्तावेजांची तोंडमिळवणी करायची, रांगेत उभे राहायचे आणि हाती काय, तर तारीख लिहिलेली पावती. अमुक दिवशी अमरावतीला आपल्या कापसाची मोजणी होईल, असा शेरा. त्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक जुळवाजुळव करण्याची कसरत. कापूस पणन महासंघाचे नांदगावात कापूस खरेदी केंद्र उघडण्यात आले नाही. परिणामी, ३६ किलोमीटरील अमरावती येथील केंद्रावर शेतकऱ्यांना कापूस विक्रीला नेण्याचे हेलपाटे सहन करावे लागणार आहेत. तेथे ज्या दिवशी सूचित केले, त्या दिवशी मोजणी झाली तर ठिक, अन्थया दुसऱ्या दिवशीचे ट्रॅक्टर वा बैलबंडीचे भाडे शिरावर. अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी घेरलेल्या शेतकऱ्यांवर हा अधिकचा भुर्दंड का, असा खडा सवाल नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
यंदा का नाही?
नांदगाव खंडेश्वर येथे गतवर्षी १ हजार ७६९ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. यावर्षी शासकीय कापूस खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. गतवर्षी येथे कापूस खरेदी केंद्र उघडण्यात आले होते. यावर्षीही नांदगावात कापूस खरेदी केंद्र उघडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोट
तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नांदगावात कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा शेतकऱ्यांना ३६ किमी अंतरावरील अमरावती गाठावे लागेल. शेतकरी त्यासाठी तयार नाहीत.
- विलास सावदे, शेतकरी, कणी मिर्झापूर
कोट २
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कापसाची नोंदणी केल्यानंतर ती यादी अमरावती येथील कापूस खरेदी केंद्राकडे पाठविण्यात येईल. खरेदी केंद्र हा आमच्या अखत्यारीतील विषय नाही.
- अमित मोहोड, सचिव, बाजार समिती, नांदगाव खंडेश्वर