कनिष्ठ महाविद्यालयांकडे शासनाचे दुर्लक्ष - शेखर भोयर
By Admin | Updated: June 15, 2014 23:14 IST2014-06-15T23:14:28+5:302014-06-15T23:14:28+5:30
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या तुलनेत कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांकडे दुर्लक्ष करून अनेक अन्यायकारक निर्णय शासनाने पारित केल्याचा आरोप,

कनिष्ठ महाविद्यालयांकडे शासनाचे दुर्लक्ष - शेखर भोयर
अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या तुलनेत कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांकडे दुर्लक्ष करून अनेक अन्यायकारक निर्णय शासनाने पारित केल्याचा आरोप, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व विदर्भ जनसंग्राम शिक्षक संघटना आणि उर्दू टिचर्स असोसिएशन पुरस्कृत उमेदवार शेखर भोयर यांनी केला.
राज्यातील तसेच अमरावती जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मतदारांनी कौल दिल्यास निवडून आल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवेन, असा संकल्पदेखील शेखर भोयर यांनी केला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमधील पटसंख्येच्या निकषांमध्ये तफावत आढळून येत आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येक तुकडीमध्ये विद्यार्थी संंख्येची कमाल मर्यादा अधिक असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुकड्या बंद पडत आहेत. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. परिणामी शिक्षकाच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षकांच्या मानधनाबाबतही हीच तफावत आढळून येते. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या मानधनामध्ये सन २०११ मध्ये वृध्दी करण्यात आली. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण सेवकांचे मानधनही वाढविण्यात आले. परंतु कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणसेवकांच्या मानधनामध्ये अत्यल्प वृध्दी करण्यात आली आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यामुळेच शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी व शिक्षकांच्या न्याय्य हक्कांच्या लढ्यासाठी शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी बोलताना शेखर भोयर यांनी केले.