रेड्डींनी राष्ट्रीय बांबू अभियान मिळविले धुळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST2021-05-11T04:13:33+5:302021-05-11T04:13:33+5:30
कॅप्शन - बांबू प्रक्रिया युनिटकरिता खरेदी करण्यात आलेल्या मशीन धूळखात पडल्या आहेत. -------------------------------------------------------------------------------------------- हायटेक नर्सरीला तिलांजली, लाखोंच्या मशीन ...

रेड्डींनी राष्ट्रीय बांबू अभियान मिळविले धुळीस
कॅप्शन - बांबू प्रक्रिया युनिटकरिता खरेदी करण्यात आलेल्या मशीन धूळखात पडल्या आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------
हायटेक नर्सरीला तिलांजली, लाखोंच्या मशीन धूळखात, ७१ लाख व्याघ्र प्रतिष्ठानांत पडून
अनिल कडू
परतवाडा : महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे सोपविले गेलेल्या राष्ट्रीय बांबू अभियानास तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी धुळीस मिळविले आहे. त्यांनी तीन वर्षांपासून हे राष्ट्रीय बांबू अभियान गुंडाळून ठेवले. या अभियानांतर्गत उभारावयाच्या हायटेक बांबू नर्सरीला त्यांनी तिलांजली दिली आहे.
बांबू प्रक्रिया युनिट अंतर्गत बांबू प्रशिक्षणाकरिता खरेदी केल्या गेलेल्या लाखो रुपयांच्या मशीन एका गोडाऊनमध्ये कचऱ्यासमान धूळखात पडल्या आहेत. या नव्या मशीनसमवेत ज्या मशीन प्रादेशिक वनविभागाच्या आहेत, त्याही निर्धारित ठिकाणावरून काढून व्याघ्र प्रकल्पाच्या कस्टडीत घेण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांचेकडून राष्ट्रीय बांबू अभियान अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ८३ लाखांचा निधी दिला गेला. यात हायटेक बांबू नर्सरीकरिता ५० लाख, प्रक्रिया युनिटकरिता ३० लाख, शेतकऱ्यांना उपयोगी अशा डेमॉन्स्ट्रेशन प्लॉटकरिता ३ लाख दिले गेले. यातील प्रक्रिया युनिट अंतर्गत ११ लाख ९५ हजार २७१ रुपये बांबू प्रशिक्षण यंत्रे खरेदीवर खर्च झालेत. उर्वरित ७१ लाख ४ हजार ७२९ रुपये मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात वळते केल्या गेले. हा महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून दिला गेलेला ७१ लाखांचा निधी तीन वर्षांपासून या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात पडून आहे.
रामदास आंबटकरांकडून लक्षवेध
विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर यांनी सन २०२१ मध्ये विधान परिषद तारांकित प्रश्न क्रमांक ७,०८० अन्वये यावर लक्ष केंद्रित केले होते. महाराष्ट्र बांबू विकास मंडळातील निधीचा नियमबाह्य वापर झाल्याबाबतचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नांच्या उत्तरादाखल माहितीतून व्याघ्र प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय बांबू अभियान संबंधितांकडून दुर्लक्षित ठेवल्याचे सत्य उघड झाले आहे.