आरोग्य विभागात होणार नोकरभरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST2021-06-18T04:09:51+5:302021-06-18T04:09:51+5:30
अमरावती : ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषद अंतर्गत येणारे आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला ...

आरोग्य विभागात होणार नोकरभरती
अमरावती : ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषद अंतर्गत येणारे आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गातील जवळपास ३२१ रिक्त पदांची भरतिप्रक्रिया जुलै व ऑगस्ट महिन्यात राबविण्यात येणार आहे. याकरिता आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध संवर्गातील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. यात औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक पुरुष-महिला, आरोग्य हंगामी फवारणी कर्मचारी संवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठी आरोग्य विभागाने मार्च २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज मागविले होते. राज्यात सत्तांतरानंतर ही भरतिप्रक्रिया रखडली आणि महापरीक्षा पोर्टल बंद पडले. त्यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नवीन खासगी कंपनीची याकरिता निवड केली. त्यांच्यामार्फत ही भरतिप्रक्रिया राबविली जाणार आहे.
-------------
दिव्यांगांचा टक्का वाढला
दिव्यांगांसाठी राखीव तीन टक्क्यांऐवजी त्यांना चार टक्के जागा देण्यात येणार आहेत. त्यामुळे राखीव जागांची संख्या बदलणार असल्याने त्यासाठी ३० जून रोजी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्याव्यतिरिक्त जाहिरात प्रसिद्ध होणार नसल्याने उमेदवारांना स्वतंत्र अर्ज करता येणार नाही. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या आधारे पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. वरील संवर्गाच्या परीक्षा ७ ते २३ ऑगस्ट कालावधीत घेतल्या जाणार आहेत.
बॉक्स
या पदांसाठी भरती
औषधनिर्माण अधिकारी - ९, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - १, आरोग्य सेवक पुरुष - १५ आरोग्य, हंगामी फवारणी कर्मचारी - २७, आरोग्य सेवक महिला - १०२ अशी पदभरती होत आहे. पेसा क्षेत्रातील रिक्त पदे शंभर टक्के आदिवासी उमेदवारांमधून भरली जाणार आहेत. यात आरोग्य सेवक पुरुष ५५, आरोग्य सेवक महिला ११२ या पदांचा समावेश आहे. या पदभरतीसाठी आरोग्य विभागाने २०१९ मध्ये ऑनलाईन अर्ज मागविले होते. त्यामुळे भरतिप्रक्रियेची पुढील कार्यवाही आता सुरू झाली आहे.