लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा :विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावरील पारा घसरलेला आहे. गुरुवारी पहाटे ३ ते ५ दरम्यान ५ अंश सेल्सिअसची नोंद घेण्यात आली. यावर्षी सर्वात कमी ३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता. तेव्हापासून कायम एक अंकी आकड्यावर विदर्भाच्या नंदनवनाचे तापमान स्थिरावले आहे. परिणामी परिसर गारठला आहे. स्थानिक तसेच पर्यटक उबदार कपड्यांसह शेकोटी पेटवून बचाव करीत आहेत.
आठवडाभर सर्वत्र थंडीची लाट जाणवणार असल्याचे हवामान खात्याने पूर्वीच जाहीर केले आहे. चिखलदरा येथे मागील महिन्याभरापासून तापमानात कमालीची घट आली आहे. कुडकुडत्या थंडीमुळे स्थानिक रहिवासी धास्तावले आहेत. सकाळच्या कोवळ्या व दुपारच्या उन्हातही गार वारे असल्याने अंगात उबदार कपडे सतत घालून राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
खोकल्याचे रुग्ण वाढले
सततच्या थंडीमुळे कोरड्या होणाऱ्या त्वचेमुळे अंगा-पायाला खाज व कोरड्या खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, असे माजी नगरसेवक अरुण तायडे यांनी सांगितले.
नाताळ सुटी ते थर्टी फर्स्ट
नाताळ सुटी ते थर्टी फर्स्ट दरम्यान मोठ्या संख्येने पर्यटक चिखलदरा पर्यटनला येतात. त्यावेळी उबदार कपडे आणून पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चिखलदऱ्यात तापमानाची एक आकडी नोंद
चिखलदरा पर्यटनस्थळावरील सिपना महाविद्यालयात लावण्यात आलेल्या तापमान केंद्रावर गुरुवारी पहाटे ३ ते ५ च्या सुमारास ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे प्रा. विजय मंगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मागील २० दिवसांमध्ये सर्वात कमी ३ अंश सेल्सिअसची नोंद ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत एकेरी आकड्यांमध्ये मध्यरात्री पहाटेचे तापमान नोंदविले जात आहे.
सेमाडोह, कोलकाससुद्धा गारठले
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह, कोलकास व मध्य प्रदेशच्या कुकरू, खामला व्हॅलीमध्येसुद्धा तापमान घसरले आहे. या परिसरातसुद्धा मोठ्या संख्येने पर्यटक जातात. आता ख्रिसमस व इअर एन्डिंगला त्यात भर पडणार आहे. विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदऱ्यासह आसपासच्या पर्यटनस्थळांवर देखील तिच परिस्थिती आहे. तेथील तापमानदेखील सरासरी १० अंश सेल्सिअसच्या खाली असल्याचे समोर आले आहे.
Web Summary : Chikhaldara experiences record cold, dropping to 5°C. The cold wave is expected to continue for a week, impacting locals and tourists. Cases of cough and skin irritation are rising. Tourists are advised to bring warm clothes.
Web Summary : चिखलदरा में रिकॉर्ड तोड़ ठंड, तापमान 5 डिग्री सेल्सियस तक गिरा। ठंड की लहर एक सप्ताह तक जारी रहने की उम्मीद है, जिससे स्थानीय लोग और पर्यटक प्रभावित हैं। खांसी और त्वचा में जलन के मामले बढ़ रहे हैं। पर्यटकों को गर्म कपड़े लाने की सलाह दी जाती है।