अमरावतीची ‘टेक्सटाईल सिटी’ म्हणून ओळख
By Admin | Updated: April 30, 2016 23:57 IST2016-04-30T23:57:53+5:302016-04-30T23:57:53+5:30
नांदगावपेठ येथील टेक्सटाईल पार्कमध्ये सियाराम कंपनीच्या गोल्डन फायबर युनिटचे भूमिपूजन मागील वर्षी झाले होते.

अमरावतीची ‘टेक्सटाईल सिटी’ म्हणून ओळख
मुख्यमंत्री : शेतीवर आधारित उद्योगनिर्मितीवर विशेष भर
अमरावती : नांदगावपेठ येथील टेक्सटाईल पार्कमध्ये सियाराम कंपनीच्या गोल्डन फायबर युनिटचे भूमिपूजन मागील वर्षी झाले होते. या कंपनीच्या युनिटचा आज शुभारंभ होत आहे. रेमंडसारखा उद्योग येथे आल्यामुळे अन्य मोठे उद्योगही येथे येण्यास उत्सूक आहेत. भविष्यात या परिसरात शेतीवर आधारित उद्योगांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होईल व येत्या चार वर्षांत अमरावतीची टेक्सटाईल सिटी म्हणून राज्यात ओळख निर्माण होईल, असा आशावाद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
ते शनिवारी नांदगावपेठ येथील रेमंड कंपनीच्या मल्टिस्पेशालिटी टेक्सटाईल व गारमेंट निर्माण युनिटच्या पायाभरणीप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, रेमंड ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख, आ. रवी राणा, आ. यशोमती ठाकूर, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. रमेश बुंदिले, आ. अनिल बोंडे, आ. आशिष देशमुख, महापौर चरणजितकौर नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, शाम इंडोफॅबचे शाम गुप्ता आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात 'मेक इन इंडिया' सप्ताहांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित सामंजस्य करार झालेल्या रेमंड कंपनीचे आज एप्रिलमध्ये भूमिपूजन करतांना आनंद होत असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. उद्योगांच्या विकासासाठी शासनाने गतीमान पद्धतीने केलेल्या कामाची ही फलश्रृती आहे. पंचतारांकित एमआयडीसी क्षेत्रात उद्योग कंपन्यांचा कल वाढत असून आता उद्योगांना जागा कमी पडत आहे.
विदर्भात १० वस्त्रोद्योग पार्क
अमरावती : राज्य शासनाचे धोरण उद्योगांसाठी पूरक व सकारात्मक असल्याचे रेमंडच्या रुपाने दिसत आहे. मोठ्या वस्त्रोद्योगामुळे उद्योग विकासाचे छत्र निर्माण होऊन त्यामुळे वाहतूक, पॅकिंग, अन्य लघु उद्योजकांना लाभ मिळेल. राज्यातील १० वस्त्रोद्योग पार्क विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात स्थापन करणार. कापूस उत्पादक पट्ट्यातच वस्त्रोद्योग उभारणार जेणेकरून तेथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. उद्योग विभाग गतिमान झाला असून वस्त्रोद्योगामुळे कापसाची मूल्यवृद्धी होईल आणि हे खऱ्या अर्थाने टेक्सटाईल पार्कचे यश असेल, असे त्यांनी सांगितले.रेमंड लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी यावेळी महाराष्ट्रात ८ ठिकाणी रेमंडचे युनिट असून १० हजारांहून जास्त लोकांना रोजगार रेमंडनी दिला आहे. विदर्भात यवतमाळ येथे १९९५ मध्ये सुरु केलेल्या डेनिम फॅब्रिक कंपनीने २५०० हून अधिक लोकांना रोजगार दिला असल्याचे सांगितले. नांदगाव पेठमधील या उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात १४०० कोटी रुपयांच्या भांडवल गुंतवणुकीसह ८ हजारांहून अधिक लोकांना रोजगार संधी उपलब्ध होतील व मार्चअखेर उत्पादन सुरू होईल, असे सांगितले. राज्य शासनाने गतिमान पद्धतीने केलेल्या कामामुळेच दोन महिन्यांत प्रकल्पाचे भूमिपूजन होऊ शकले. सर्वांच्या सहकार्यानेच हा प्रकल्प यशस्वी होईल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक रेमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी. गुप्ता, संचालन नीलिमा हावरे व आभार प्रदर्शन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.