खासगी शिकवणी वर्गांचा सुळसुळाट
By Admin | Updated: August 18, 2015 00:20 IST2015-08-18T00:20:18+5:302015-08-18T00:20:18+5:30
शहरात अनेक वर्षांपासून खासगी शिकवणी वर्गाचे येथे पेव फुटले असूून कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी शिक्षणाच्या नावावर व्यवसाय थाटला आहे.

खासगी शिकवणी वर्गांचा सुळसुळाट
लोकमत विशेष
दर्यापुरात पालकांची लूट : नोकरी करणारे शिक्षक घेतात शिकवणी वर्ग
संदीप मानकर दर्यापूर
शहरात अनेक वर्षांपासून खासगी शिकवणी वर्गाचे येथे पेव फुटले असूून कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी शिक्षणाच्या नावावर व्यवसाय थाटला आहे. शाळेत विद्यादान करणारे नोकरीत असलेले शिक्षकच प्रॅक्टिकलचे अधिक गुण टाकण्याच्या नावावर विद्यार्थ्यांना भुलथापा देऊन शिकवणी लावण्यासाठी आग्रह धरत आहे.
विद्यार्थ्यांकडून शिकवणी वर्गाच्या नावावर लाखो रूपये उकळले जात आहे. ही पालकांची लूट नव्हे का, असा प्रश्न अनेक पालकांना पडला आहे. हा गोरखधंदा थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दर्यापुरात काही नामांकित शाळेत आहेत. या शाळांचे प्राध्यापक व शिक्षक नोकरीत असतानाही बाहेर खासगी शिकवणी वर्ग घेतात. कायमस्वरुपी नोकरी असलेल्या शिक्षकाने कुठलीही खासगी शिकविणी वर्ग घेऊ नये, हा अनेक वर्षांपासून शिक्षण विभागाचा व शासनाचा नियम आहे. परंतु या नियमांची पायमल्ली करून अनेक दिवसांपासून विद्यादानाच्या नावावर शिकवणी वर्ग सर्रास सुरू आहेत. परंतु शिक्षणाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अनेक वर्षांत एकदाही शिक्षण विभागाची धाड खासगी कोचिंग क्लासेसवर पडली नाही. शहरात एका नामांकित शाळेच्या प्राध्यापकांनी व शिक्षकांनी आपण कुठलेही खासगी शिकवणी वर्ग घेत नसल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकाला लिहून दिले आहे. तशी मुख्याध्यापकांनी त्यांना नोटीसही बजावल्याचे कळते.
विद्यार्थी शाळेपेक्षा शिकवणी वर्गावर आकर्षित होऊन शाळेत अनेक वेळा कोर्स पूर्ण होत नसल्यामुळे बाहेर खासगी शिकवणी वर्ग लावतात. त्यामुळे अशा शिक्षकांना या बाबीचा फायदा होतो. एकीकडे उच्च विद्याविभूषित उच्चशिक्षित अनेक सुशिक्षित बेरोजगार असताना त्यांना नोकऱ्या नाहीत. एखाद्या संस्थेकडे जागा निघाली तर त्यांना लाखो रुपये भरावे लागतो. त्यामुळे खासगी शिकवणी वर्ग घेऊन ते पोट भरतात व त्यांचा नियमाने तसा पहिला हक्कही असतो. परंतु जे शिक्षक नोकरीत आहेत त्यांनीच अंतिम परीक्षेत जर प्रात्यक्षिकेचे मार्क पाहिजे असतील तर आमच्याकडेच शिकवणी वर्ग लावा नाहीतर तुमचे नुकसान होईल, अशी ताकिद दिल्यामुळे विद्यार्थी व पालक या बाबीचा विचार करून त्यांच्याकडेच शिकवणी वर्गच लावतात. त्यामुळे उच्चशिक्षित, सुशिक्षित बेरोजगार शिक्षकांकडे चांगले शिकविण्याचे क्षमता असतानाही त्यांना विद्यार्थी मिळत नाहीत. हा गोरखधंदा शिक्षणाधिकाऱ्यांनी थांबवावा, अशी मागणी होत आहे. नोकरीत असलेल्या शिक्षकांच्या 'कोचिंग क्लासेस'वर धाडी टाकून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दर्यापुरातल्या गरीब पालकांनी केली आहे. काही कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी लाखोंची माया जमविली आहे. ते विद्यार्थ्यांना कुठलीही पावती देत नसून कराचा भरणाही करीत नाही. नुकतीच नागपूर येथे आयकर विभागाने अशा शिकवणी वर्गावर धाड टाकून कारवाई केली, हे विशेष.
प्राध्यापकांनी बसविले सर्व नियम धाब्यावर
काही प्राध्यापकांनी या सर्व बाबीला केराची टोपली दाखवून राजरोसपणे आपल्या दुकानदाऱ्या थाटल्या आहेत. इयत्ता दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या 'करिअर'चा टर्निंग पॉर्इंट असतो. त्यामुळे पालकही आपल्या पाल्याच्या शिक्षणावर वारेमाप पैसा खर्च करतात. नेमका याचाच फायदा शिक्षकांनी घेऊन चार विषयाचे ६० हजार रुपये एवढे शुल्क आकारल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ज्या कुठल्या गरीब पालकाकडे त्यांच्या पाल्यांना देण्यासाठी पैसे नसतात ते काही अभ्यासक्रमांपासून वंचित राहतात. या शिक्षकांनी शाळेतच रक्ताचे पाणी करून विद्यार्थ्यांना विद्यादानाचे अनमोल कार्य करणे अपेक्षित आहे.