'दहाक्रिया' परिसराची पुनर्बांधणी
By Admin | Updated: July 31, 2016 00:05 IST2016-07-31T00:05:03+5:302016-07-31T00:05:03+5:30
येथील हिंदू स्मशानभूमी संस्थेची ३० हजार चौरस फुटाची व्याप्ती आहे.

'दहाक्रिया' परिसराची पुनर्बांधणी
देगणीतून 'नवोप्रकम' : हिंदू स्मशानभूमीचा कायापालट
अमरावती : येथील हिंदू स्मशानभूमी संस्थेची ३० हजार चौरस फुटाची व्याप्ती आहे. या परिसराच्या विकासाची संकल्पना धनराज बूब यांनी मांडून 'दशक्रियाविधी' परिसराची पुनर्बांधणी हाती घेतली आहे. त्यांच्या मरणोपरांत त्यांचे नातू आणि हिंदू स्मशान संस्थेने त्याला मूर्तस्वरुप दिले आहे. देणगी स्वरुपात मिळालेल्या ४० लाखांसह अन्य खर्चाची जबाबदारी संस्था उचलणार असून नागपूरचे महेश मोरवा या आर्र्किटेक्टने या परिसराचा प्रागतिक कायापालट करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
येथील हिंदू स्मशान संस्था महाराष्ट्रात ख्यातीप्राप्त आहे. एखादे स्मशान कसे सुसज्ज, निसर्गरम्य आणि सुविधायुक्त असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंबानाल्याकाठी विस्तारलेली हिंदू स्मशान संस्था! शहरातील सुमारे ७० टक्क्यांवर नागरिकांवर मरणोपरांत अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था या संस्थेने उपलब्ध केली आहे. अग्निदहनासह लहान मुलांची स्मशानभूमी व 'माजी' देण्यासाठीही या ठिकाणी जागा आणि सुविधा उपलब्ध आहे.
मोर्शी येथील धनराज बूब यांनी काही महिन्यांपूर्वी ४० लाख रुपयांची देणगी देण्याचा संकल्प सोडला. त्यांच्या निधनानंतर ती जबाबदारी त्यांचे नातू व हिंदू स्मशान संस्थेने घेतली आहे. सुमारे ७० लाख रुपये खर्च करून येथे दशक्रियाविधीसाठी सुशोभित वास्तू साकारण्यात येणार आहे. यात स्वतंत्र प्रसाधनगृह, आंघोळीसाठी जागा, गरमपाण्याची व्यवस्था, वॉटरकूलर, केस देण्यासाठी जागा, दशक्रियेसाठी येण्याऱ्यांची संपूर्ण व्यवस्था केली जाणार आहे. हे 'आर्टीस्टिक' काम उन्हाळयापर्यंत पूर्ण होणार आहे. नाल्याच्या भिंतीलगत 'शांतीवन' निर्मितीचा संकल्प सोडला आहे. मृतदेह ठेवण्यासाठी संस्थेकडे चार अत्याधुनिक शितपेटी २०० लॉकर्स, वुड गोडावून. ओपन शेड्स, दशववाहिका आहे.
हिंदू स्मशान संस्थेचे उपक्रम
दिवसाकाठी १० पार्थिवांवर अंतिमसंस्कार करण्यासोबतच संस्थेने गरीब कुटुंबांसाठी याच परिसरात त्रिवेणी अस्थी विसर्जन तलाव साकारला आहे. या तलावात अस्थी विसर्जनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय जे हरिद्वारला जाऊ शकत नाहीत, त्यांच्या आप्तेष्टांच्या अस्थी संस्थेकडून प्रयाग आणि अलाहाबादला विसर्जित करण्यात येतात.
प्रदुषणाला आळा
हिंदूस्मशानभूमित दिवसाकाठी सरासरी १० शव जाळले जातात. त्यातून ६०० किलो राख बाहेर पडते. ती राख अस्थी विसर्जनाच्या माध्यमातून नदीत मिसळली जाते. त्यामुळे प्रदूषणात मोठी वाढ होते. याशिवाय त्रिवेणी जलाशयात महिन्याकाठी जमा होणारी राखेचे प्रमाण पाहता नागरिकांनी गॅसदाहिनेकडे वळावे, असे आवाहन हिंदूस्मशान संस्थेने केले आहे.
संपूर्ण साहित्य एकाच छताखाली
स्त्री-पुरुषांच्या अंतिमसंस्कारासाठी आणि दहाव्या, बाराव्या दिवशी होणाऱ्या क्रियाकर्मासाठी आवश्यक असलेले सर्वसाहित्य गांधी चौकातील दुकानात उपलब्ध आहेत. एकाच छताखाली सर्व साहित्य मिळत असल्याने येथे पंचक्रोशीतील लोक येतात.
गॅसदाहिनीकडे
वाढावा ओढा
हिंदू स्मशान संस्था परिसरात दोन कोटी रुपये खर्च करून ६००० चौरस फूट क्षेत्रात गॅस दाहिनी उभारली आहे. एलपीजे गॅसच्या माध्यमातून अंतिम संस्कार केले जातात. २५ नोव्हेंबर २०१४ ला ही गॅस दाहिनी सुरू झाली. मात्र अद्यापही मृतांचे कुटुंबीय अंतिम संस्कारासाठी परंपरागत पद्धतीला पसंती देतात. रोज १० संस्कार होत असताना त्यातील तिघांवरच गॅस दाहिनीत अंतिमसंस्कार केल्या जातो. हे प्रमाण वाढवे यासाठी संस्थेने अंतिम संस्कारासाठी २०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. याकडे ओढा हा यामागील उद्देश आहे.