आतापर्यंत १५ अंधांना कोरोनाची लागण,
अमरावती : गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. यापासून अंध व्यक्तीदेखील सुटू शकले नाहीत. आतापर्यंत जिल्ह्यात १५ अंध व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, एकही जण दगावल्याची नोंद नाही. मात्र, कोरोनाच्या काळात रुग्णालयातील अनुभवापेक्षा घरच्यांनी ज्या पद्धतीने साथ दिली, आपण कोरोनावर त्यामुळेच मात केल्याचे हे अंध बांधव सांगतात. कोरोनाकाळात कुटुंबच आपल्यासाठी खरा आधार ठरल्याची भावना अंध व्यक्तींची आहे.
दुसऱ्या लाटेतही अंध व्यक्तींना कोरोनाने आपल्याकडे खेचले आहे. जिल्ह्यात आतापर्यत सुमारे १५ अंधांना कोरोनाची लागण झाली आहे. परंतु, शासकीय पातळीवर अशा कोरोना रुग्णांची आकडेवारी वेगळी केलेली नसल्याची माहिती पुढे आली आहे. असे असले तरी अंध व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी त्यांना काय हवे, काय नको, हे पाहणेदेखील महत्वाचे होते. अशा रुग्णांवर उपचार करताना त्यांना हातात वा शक्य तेवढ्या जवळ काय देता येईल, याची काळजी मात्र रुग्णालयाकडून घेण्यात येत होती. तथापि, काही रूग्णांना शासकीय रूग्णालयाच्या देखील काहीसा वाईट अनुभव आल्याचे दिसून आले आहे. अमरावती येथील एका अंध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात तो रुग्ण पॉझिटिव्ह आला होता. तो रेल्वे गाड्यांमध्येहॉकर्स म्हणून काम करीत होता. पॉझिटिव्ह आला तेव्हा पत्नीनेच त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याठिकाणी उपचारासाठी विलंब, आयसीयूमध्येही वाईट अनुभव आले. अखेर या अंध रुग्णाने दहाव्या दिवशीच डॉक्टरांना सांगून डिस्चार्ज घेतला. त्यानंतर घरीच ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून घेऊन कुटुंबीयांच्या मदतीने त्याने कोरोनावर मात केली. या कठीण काळात त्याची काळजी घेताना पत्नी, आई आणि मोठ्या मुलालादेखील कोरोनाची लागण झाली. मात्र, या सर्वांनी कोरोनावर मात केली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत एखाद्याला कोरोना झाला, तर त्याला शेजारीदेखील वाळीत टाकायचे, असा वाईट अनुभव आले आहेत. परंतु, अंध व्यक्तींना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्या मदतीसाठी काहींनी हात पुढे केला, शिवाय या वाईट काळात कुटुंबाची समर्थ साथ लाभली, असे अंध व्यक्ती सांगत आहेत.
०००००००००००००००००००००००
आधारही एकमेकांचाच
कोट
घरखर्च भागविण्यासाठी आम्ही व्हाईट फिनाईल घरी तयार करून प्रत्येक दुकानात, दवाखान्यात जाऊन विक्री करतो. कोरोना रुग्ण वाढत आहेत व निर्बंध असल्याने बाहेर निघणे बंद आहे. प्रतिसादही कमी प्रमाणात मिळत आहे.
- गजानन अडकणे
कोरोनाकाळाआधी रेल्वे गाड्यांत हॉकर म्हणून विविध साहित्य, वस्तू विक्रीतून उदरनिर्वाह सुरू होता. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून हा व्यवसाय बंद आहे. मोजक्याच रेल्वे गाड्या सुरू असून, प्रवासी अल्प आहेत. आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
- राजू घोरपडे
झाडांना लागत असलेली कीड, बुरशीवर उपाययोजनांसाठी लागणारी औषधी विक्री करीत असतो. घरपोच सेवा देत होतो. आता लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. विक्री मंदावली आहे. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
.- अनिल मोरे
---------------
कोरोनाकाळात अंध बांधवांना अडचणी येत आहेत. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. या अंधांना भारतीय अंधजन विकास व पुनर्वसन संस्थेने मदतीचा हात दिला आहे. अन्नधान्य वाटप केले आहे. आतापर्यंत १०० अंधांना ५०० रुपये दरमहा मानधन देण्यात आल्याची माहिती संस्थेचे महासचिव शाकीर नायक यांनी दिली. अंध व्यक्तींचे कोरोनाकाळात मोठे हाल झाले आहेत. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-------------
बॉक्स
स्वत:ला व्यक्त करताना अडचणी
अंध व्यक्तींना स्पर्शाने अनेक गोष्टींशी परिचय होत असतो. दुसरीकडे मूकबधिर ओठांच्या हालचालींनी संवाद साधत असतात. कोरोनाकाळात स्वत:ला व्यक्त करताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत.