रवी राणा म्हणतात... खुशाल दिल्लीला या अन् अटक करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 21:22 IST2022-02-14T21:20:44+5:302022-02-14T21:22:46+5:30
Amravati News मी कुठेही फरार झालेलो नाही. पोलीस बोलावतील तेव्हा मी अमरावतीत यायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांना माझी अटकच हवी असेल, तर पोलिसांना दिल्लीला पाठवा, मी अटक करवून घेण्यास तयार आहे, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला.

रवी राणा म्हणतात... खुशाल दिल्लीला या अन् अटक करा!
अमरावती : मी कुठेही फरार झालेलो नाही. पोलीस बोलावतील तेव्हा मी अमरावतीत यायला तयार आहे. सहकार्यासदेखील तयार आहे. एवढेच काय, तर मुख्यमंत्र्यांना माझी अटकच हवी असेल, तर पोलिसांना दिल्लीला पाठवा, मी अटक करवून घेण्यास तयार आहे, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला. आपण दिल्लीतच आहोत, फरार नाही, असे सांगणारा व्हिडीओ सोमवारी त्यांनी ‘लोकमत’ला पाठविला.
९ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्तांवर शाईफेक झाली. त्यावेळी आपण दिल्लीत होता. आजदेखील दिल्लीतच आहात. आपल्यावर ३०७ दाखल झाला, ते माध्यमांतून कळल्यावर आपण दुसऱ्याच दिवशी दिल्लीत पत्रपरिषद घेतली. मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिसांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मी निर्दोष आहे. कुठेही फरार झालेलो नाही. आजदेखील दिल्ली येथे झालेल्या रेल्वेच्या बैठकीत सहभागी झालो. त्यामुळे पोलीस जेव्हा बोलावतील, तेव्हा मी अमरावतीत यायला तयार असल्याचे राणा यांनी जारी केलेल्या व्हिडीओद्वारे म्हटले आहे.
तपास योग्य दिशेने सुरू आहे. पुरावे गोळा केले जात आहेत. वेळ पडली तर, दिल्ली वा आरोपी जेथे कुठे असतील, तेथे पथक पाठविण्यात येईल.
- भारत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त तथा तपास अधिकारी