अमरावतीत आढळला कवड्या प्रजातीतील दुर्मिळ पांढरा साप
By Admin | Updated: June 6, 2017 00:05 IST2017-06-06T00:05:15+5:302017-06-06T00:05:15+5:30
नवसारी परिसरात कवड्या प्रजातीचा पांढरा साप आढळल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला.

अमरावतीत आढळला कवड्या प्रजातीतील दुर्मिळ पांढरा साप
जेनेटिक बदलाचा क्वचितच योग : वन्यप्रेमींसह नागरिकांना उत्सुकता
वैभव बाबरेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवसारी परिसरात कवड्या प्रजातीचा पांढरा साप आढळल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. जेनेटिक बदलाचा दुर्मिळ योग अमरावतीत पाहायला मिळाल्यामुळे वन्यप्रेमींसह नागरिकांना उत्सुकता लागली होती.
अलबिनो कवड्या नावाने ओळखला जाणारा हा साप कवड्या प्रजातीतील असून तो रंगहीन असल्याचे जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळून आले आहे. नवसारी परिसरातील जवंजाळ यांच्या घराच्या आवारात रविवारी हा साप आढळला. आशिष याने याबाबत कार्स संघटनेला माहिती दिली. त्यानुसार सर्पमित्र मुन्ना पवार यांनी सापाचे निरीक्षण केले. त्याची ओळख न पटल्यामुळे त्याने अनुभवी सर्पमित्र चेतन भारतीकडे तो साप नेला असता तो साप कवड्या प्रजातीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी सापाला कार्सचे वन्यजीव अभ्यासक राघवेंद्र नांदे याच्याकडे नेले असता त्यांनी या सापात कशाप्रकारे बदल झाला असावा, यावर अभ्यास केला. त्यावेळी सापाच्या शरीरातील जेनेटिक बदलामुळे या सापाचा रंग पांढरा झाल्याचा तर्क नांदे यांनी लावला. हा साप दुर्मीळ नाही, मात्र, पांढरा साप आढळून येणेही प्रक्रिया दुर्मिळ असल्याचे नांदे यांनी सांगितले.
जेनेटिक बदल ही प्रक्रिया दुर्मिळ
कवड्या साप कोठेही आढळतो. मात्र, पांढऱ्या रंगाचा साप पहिल्यांदाच जिल्ह्यात आढळला आहे. नांदे यांच्या निरीक्षणानुसार सापाच्या शरीरातील जेन्सिटिक बदलाचा हा परिणाम आहे. निसर्गातील प्रत्येक सजीवांचा काळानुरुप बदल होत असतो. मानव प्रजातीप्रमाणे वन्यजीवांमध्येही बदल घडून येतात. वन्यप्राण्यांच्या वनस्पती शरीरावरील स्वाभाविक रंग म्हणजेच पिग्मेंट आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी साप महत्त्वाचे आहे. कवड्या सापातील जेनेटिक बदलामुळे हा साप रंगहीन झाला. त्याला पांढरा रंग मिळाला आहे. ही क्वचितच घडणारी प्रक्रिया आहे. त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडले.
- राघवेंद्र नांदे,
वन्यजीव अभ्यासक.