रंगोली लॉन, मंगल कार्यालयाचे मोजमाप
By Admin | Updated: October 6, 2015 00:27 IST2015-10-06T00:27:59+5:302015-10-06T00:27:59+5:30
येथील कठोरा मार्गावरील रंगोली लॉन व मंगल कार्यालयाचे सोमवारी मोजमाप करण्यात आले.

रंगोली लॉन, मंगल कार्यालयाचे मोजमाप
आयुक्तांचे आदेश : अतिरिक्त बांधकाम असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट
अमरावती : येथील कठोरा मार्गावरील रंगोली लॉन व मंगल कार्यालयाचे सोमवारी मोजमाप करण्यात आले. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून काही निवासस्थाने, टिनाचे शेड, लॉन व कॉर्नरवरील दुकान अनधिकृत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
सन १९९८- ९९ मध्ये बांधकाम मंजूर मिळालेल्या रंगोली मंगल कार्यालयाचे मोजमाप करण्यापूर्वी या वास्तुच्या संचालकांना महापालिका प्रशासनाने बांधकाम मनजुरीचे कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटिस बजावलीे होती. परंतु मंगल कार्यालयाच्या संचालकांनी बांधकामसंदर्भात कागदपत्रे सादर केली नाही. परिणामी सोमवारी या वास्तुचे मोजमाप करुन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्त गुडेवारांनी दिले. सोमवारी मोजमाप करणाऱ्या पथकात सहायक संचालक नगर रचना विभागाचे सहायक अभियंता दीपक खडेकार, नितीन भटकर, घनशाम वाघाडे आदी कर्मचारी वर्ग हजर होता. लॉनची निर्मिती करण्यात आली असली तरी हे लॉन पार्किंगसाठी राखीव असल्याचा अंदाज अभियंत्यांनी वर्तविला आहे. अंतर्गत व बाह्य बांधकामात बरीच तफावत निदर्शसनास आली आहे. एकुणच बांधकाम असलेल्या परिसराची मोजणी करण्यात आली आहे.
रेकॉर्ड रुममधून रंगोली मंगल कार्यालय व लॉनची फाईल मंगळवारी तपासली जाणार आहे. मोजणीनुसार हे बांधकाम आहे अथना नाही, हे आयुक्तांना कळविले जाईल, अशी माहिती आहे. दरम्यान झोन क्र. १ चे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी रंगोली लॉन व मंगल कार्यालयाला अतिरिक्त बांधकाम प्रकरणी ९० लाख रुपयांची दंडात्मक कारवाईची नोटिस बजावल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
दिल्ली येथून गुडेवारांचे नियंत्रण
रंगोली लॉन व मंगल कार्यालयाची मोजणी करण्याचे आदेश दिल्यानंतर आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे सोमवारी दिल्ली येथे ‘स्मार्ट सिटी’ संदर्भात आयोजित बैठकीला गेले होते. मात्र ‘रंगोली’ मोजमाप करण्याची प्रक्रिया निटपणे सुरु आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी आयुक्त गुडेवारांनी दिल्लीहून अभियंत्याशी भ्रमनध्वनीहून संपर्क साधून कारवाईची माहिती घेतली, हे विशेष.