बंदींना गांजा पुरविणाऱ्या दोघांना कोर्टात रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:59 IST2019-08-03T00:58:49+5:302019-08-03T00:59:31+5:30
मुशिर आलम हत्याकांडातील दोन न्यायाधीन बंदींना गांजा पुरविणाºया दोन तरुणांना न्यायालयाच्या प्रसाधनगृहात शुक्रवारी दुपारी रंगेहात पकडण्यात आले. कारागृहातील सुरक्षा गार्डने दोन्ही आरोपींना गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.

बंदींना गांजा पुरविणाऱ्या दोघांना कोर्टात रंगेहाथ पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुशिर आलम हत्याकांडातील दोन न्यायाधीन बंदींना गांजा पुरविणाऱ्या दोन तरुणांना न्यायालयाच्या प्रसाधनगृहात शुक्रवारी दुपारी रंगेहात पकडण्यात आले. कारागृहातील सुरक्षा गार्डने दोन्ही आरोपींना गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. रुपेशआप्पा गणेशआप्पा खेडकर (२८,रा. गवळीपुरा) व राजेश गोविंद मांडवे (२८, रा. कुंभारवाडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे न्यायालय परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
दीड वर्षांपूर्वी साबणपुरा परिसरात मुशिर आलम हत्याकांड घडले. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. त्यातील दोघे जामिनावर बाहेर असून, तिघे अद्यापही कारागृहात आहेत. या हत्याकांडातील आरोपी उमेश आठवले, दिनेश आठवले व शुभम जवंजाळ यांना कारागृहातील सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी दुपारी न्यायालयीन तारखेवर आणले होते. जिल्हा व सत्र न्यायालय (२) येथे या प्रकरणाची सुनावणी असल्यामुळे आरोपींना न्यायालयीन कक्षाच्या बाहेरील खुर्चांवर बसविले होते. दरम्यान उमेश आठवले लघुशंकेच्या बहाण्याने प्रसाधनगृहात गेला असता, त्याच्या मागेच पोलीस कर्मचारी एएसआय दिवाकर डोंगरे, पोलीस हवालदार हमीद खान व प्रदिप कावरे गेले. त्यावेळी तेथे रुपेशआप्पा खेडकर व राजेश मांडवे हे दोघे उमेश आठवलेला गांजा पुरविण्यासाठी उपस्थित असल्याचे पोलिसांना आढळले. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी प्रसाधनगृहात ठेवलेल्या आठ गांजाच्या पुड्या जप्त करून दोन्ही रुपेशआप्पा व राजेश मांडवेला ताब्यात घेतले. त्यांना न्यायाधीश तिवारी यांच्या न्यायालयात हजर केले.
राजेश मांडवे हत्या प्रकरणातील आरोपी
मुशिर आलम हत्याकांडातील पाच आरोपींपैकी राजेश मांडवे हा एक आरोपी आहे. त्याला घटनेनंतर अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान तो काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला आहे.
न्यायालयात केक कापल्याचे प्रकरण गाजले
काही महिन्यांपूर्वी मुशिर आलम हत्याकांडातील आरोपींनी न्यायालयाच्या प्रतिक्षालयात बर्थ डे केक कापून आरोपी उमेश आठवलेचा वाढदिवस साजरा केला होता. सदर प्रकरणाची तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी चौकशी केली. या घटनेच्या अनुषंगाने आरोपीसोबत उपस्थित असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली होती.
अशाप्रकारे पोहोचतो बंदीजनाजवळ गांजा
मध्यवर्ती कारागृहातील बंदी व कैद्याजवळ गांजा आढळल्याचे प्रकार यापूर्वी उघड झाले आहेत. बंदी व कैद्यांना न्यायालयीन तारखेवर आणल्या गेल्यावर तेथे बंदी व कैद्यांना भेटण्यासाठी काही जण येतात. त्याच्यामार्फत बंदी व कैद्यांना गांजासह अन्य काही अमली पदार्थ पुरविण्यात येत असल्याचे या घटनेवरून निदर्शनास येत आहे.