राजकुमार पटेलांची धारणी ठाण्यात शरणागती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:50 IST2018-05-08T23:50:12+5:302018-05-08T23:50:12+5:30
तालुक्यातील खारी येथील घटनेप्रकरणी पोलिसांना हवे असलेले मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी मंगळवारी दुपारी १ वाजता धारणी पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

राजकुमार पटेलांची धारणी ठाण्यात शरणागती
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यातील खारी येथील घटनेप्रकरणी पोलिसांना हवे असलेले मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी मंगळवारी दुपारी १ वाजता धारणी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. यावेळी नवनीत राणा उपस्थित होत्या. शहरात कायदा व शांततेच्या स्थितीला समर्थकांकडून बाधा पोहोचू नये, यासाठी स्थानिक पोलिसांसह चिखलदऱ्याचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
१० मेपर्यंत पोलीस कोठडी
मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी मंगळवारी दुपारी १ वाजता धारणी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. राजकुमार पटेल यांना अटक केल्यानंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी ३ वाजता त्यांना कडेकोट बंदोबस्तात प्रथम श्रेणी न्यायालयात आणले गेले. त्यांना धारणी येथील दिवाणी न्यायालयाने १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, धारणीचे ठाणेदार मोहंडुले हे रजेवर असल्याने शिवचरण पेठे यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. एडीपीओ विशाल नेहुल घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते.
पटेलांच्या घरी समर्थक
पटेल यांच्या धारणी येथील निवासस्थानी आ. रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा दुपारी पाऊण वाजताच्या सुमारास पोहोचल्या. त्यापूर्वीच समर्थक मोठ्या संख्येने या परिसरात उपस्थित झाले होते. धारणी न्यायालयात त्यांना आणले जाणार असल्याने येथेही समर्थक सकाळपासून ठाण मांडून होते.