पाऊस बेपत्ता, दोन लाख हेक्टरमधील पिके धोक्यात
By Admin | Updated: July 4, 2015 00:54 IST2015-07-04T00:54:32+5:302015-07-04T00:54:32+5:30
यंदाच्या खरीप हंगामात १२ जून रोजी पावसाने हजेरी लावली व नंतर ४ दिवस खंडानंतर पुन्हा दमदार पाऊस.

पाऊस बेपत्ता, दोन लाख हेक्टरमधील पिके धोक्यात
खरीप २०१५ : बिजांकुर करपू लागले, रोपांनी टाकली मान, शेतकरी संकटात
गजानन मोहोड अमरावती
यंदाच्या खरीप हंगामात १२ जून रोजी पावसाने हजेरी लावली व नंतर ४ दिवस खंडानंतर पुन्हा दमदार पाऊस. यामुळे खरिपाच्या पेरणीचा वेग वाढला. परंतु २२ जूननंतर एक-दोन तालुके वगळता पावसाने दडी मारली. यामुळे पेरण्या खोळंबल्या. सद्यस्थितीत ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ९७ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. हे क्षेत्र सरासरीच्या तुलनेत ५६ टक्के आहे. १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने किमान २ लाख हेक्टरमधील कोरडवाहू क्षेत्रामधील पेरणी धोक्यात आली आहे. बिजांकुर करपू लागले आहे. पहिल्या टप्यात पेरणी झालेल्या पिकांची रोपे आर्द्रतेअभावी माना टाकू लागल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
यंदा मान्सून आठवडाभर उशीर आला. परंतू दिवसाच्या खंडानंतर पावसाने दमदार हजेरी लावली. एका आठवड्यात पावसाने जून महिन्याची सरासरी पार केली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. खरीप पेरणीला वेग आला. परंतु २२ जूननंतर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या थबकल्या. परंतु पेरणी झालेली पिके मात्र धोक्यात आली आहेत. जमिनीत पुरेस्या आर्द्रतेअभावी बियाण्यांचे बिजांकुर करपू लागली आहेत. जमिनीवर मातीचे कडक आवरण तयार झाले. हा आवरण फेकून बाहेर येण्यासाठी बिजांकुरास पाण्याचा अभाव आहे. त्यामुळे अशी स्थिती असणाऱ्या पेरणी क्षेत्रात मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. मध्यम व हलक्या स्वरुपाच्या जमिनीमध्ये पिकांची अवस्था भयानक आहे. पिकांची रोपे माना टाकू लागली आहे. या पिकाकडे हताशपणे पाहण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय नाही. काही शेतात तांब्यानी पाणी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. कामाअभावी शेतमजुरावरदेखील उपासमारीची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांच्या मागे निसर्गाचे दृष्टचक्र हात धुऊन मागे लागले आहे. मागील तीन वर्षांचा आढावा घेता पिके कधी अतिपावसाने तर पावसाअभावी उद्ध्वस्त झाली आहेत. तर कधी परतीच्या पावसात सडली आहे. गारपीटनेदेखील पिकांना तडाखा दिला आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा ४० टक्के पाऊस कमी झाल्याने खरीपाचा हंगाम गारद झाला तर रबीचा हंगाम अवकाळीने बाधित झाला. खरीपाची १५ डिसेंबरची पैसेवारी ५० पैस्याच्या आत ४६ पैसे आली. जिल्ह्यातील दोन हजारवर गावे दुष्काळाच्या छायेत असल्याने शासनाने विदर्भासाठी सात हजार कोटीचे पॅकेज जाहिर केले. प्रत्यक्षात हे पॅकेज घोषणेपूरतेच मर्यादेत राहिले.
व्याजमाफी कागदावरच राहिली शासनाने घोषनेची अंमलबजावणी केली नसल्याने, खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून व्याजकपातीचा सपाटा बँकांनी सुरु केला आहे. पीककर्जाचा केवळ आकडेवारीचा खेळ सुरु आहे. उद्दिष्ठांच्या १०० टक्के कर्जवाटप करण्याचे शासनाचे निर्देश असताना पीक कर्ज वाटपाचा टक्का ५०च्या वर सरकत नाही. बँकांनी आखुडता हात घेतला आहे. निसर्गासह शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या अगतीकतेचा फायदा घेत आहे. लोकप्रतिनिधी गपगार आहेत. चारही दिशांनी बळीराजा घेरल्या गेला आहे. पावसाने १० दिवसांपासून दडी मारल्याने झालेली जिरायती पेरणीला मोड येण्याची शक्यता आहे. संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या शेतात स्प्रिंकलर बाहेर निघले अजून किमान ७ ते ८ जून पर्यंत वातावरण कोरडे राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.
पेरणीची गती खोळंबली असली तरी सद्यास्थितीत ३ लाख ९७ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ४४ हजार ४८१ हेक्टर पेरणी मोर्शी तालुक्यात झाली आहे. धारणी ३० हजरा ४२७ हेक्टर, चिखलदरा २ हजार ६१० हेक्टर, नांदगांव खंडेश्वर ३५ हजार ४२२हेक्टर, चांदूर रेल्वे २४ हजार ७०२ हेक्टर, तिवसा २८ हजार ८४४ हेक्टर, वरुड ३३ हजार ९३६ हेक्टर, दर्यापूर २२ हजार २३१ हेक्टर, अंजनगाव २६ हजार ६१ हेक्टर, अचलपूर २७ हजार ९२८ हेक्टर, चांदूर बाजार ३९ हजार ४२५ हेक्टर, व धामणगाव रेल्वे तालुक्यात ३३ हजार २४६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.
सर्वाधिक १ लाख ८८ हजार ८४७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन १ लाख २५ हजार ४३१ हेक्टर मध्ये कपाशीची पेरणी झाली आहे. यापाठोपाठ ५७ हजार ८५० हेक्टरमध्ये तूर पिक आहे. खरीपाचे ९० टक्के क्षेत्र हे या तीन पीकांचे आहे.
विभागात सद्यस्थितीत दुबार पेरणीची शक्यता नाही. शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनाचा वापर करावा, पावसात आणखी खंड पडल्यास कृषी विभागाचे आपत्कालीन पीक नियोजन व बियाणे बदलाचे नियोजन तयार आहे.
- एस.आर. सरदार,
विभागीय कृषी सहसंचालक.
सहा एकरांत सोयाबीन, संकरित कपाशीची पेरणी पहिल्या टप्यात केली. पाऊस नसल्याने पिकाला मोड आली आहे. पाऊस आल्यानंतर दुबार पेरणी करावी लागणार आहे. पहिल्या पेरणीचा व बियाण्यांचा खर्च वाया गेला.
- जितेंद्र चौधरी,
शेतकरी, शेंदूरजना (बाजार)