पाऊस ओसरणार!
By Admin | Updated: July 23, 2014 23:22 IST2014-07-23T23:22:27+5:302014-07-23T23:22:27+5:30
तीन दिवसांपासून सुरु असलेला संततधार पाऊस आता दोन ते तीन दिवस अवकाश देणार आहे. मात्र विदर्भातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

पाऊस ओसरणार!
अमरावती : तीन दिवसांपासून सुरु असलेला संततधार पाऊस आता दोन ते तीन दिवस अवकाश देणार आहे. मात्र विदर्भातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.
जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने कोरडा दुष्काळाची भीती निर्माण झाली होती. मात्र जुलै महिन्यातील तीन दिवसांच्या पावसाने ओला दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जिल्हा जलमय झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. आता हा मुसळधार पाऊस दोन ते तीन दिवस ओसरणार असून तुरळक प्रमाणात विदर्भातील काही भागात पाऊस पडण्याचे संकेत आहे. बंगाल उपसागर व गुजरात ते केरळात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच छत्तीसगड येथे चक्राकार वाऱ्याचा प्रभाव असल्यामुळे डिप्रेशन पश्चिम भागाकडे गेले आहे. या स्थितीमुळे विदर्भातील पाऊस ओसरणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात कमी अधिक पाऊस राहणार आहे. बुधवारी दुपारपासूनच पाऊस कमी झाल्याची स्थिती जिल्ह्यामध्ये दिसून आली. मात्र दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज नागपूर येथील हवामान विभाग व हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविला आहे.