पावसाने झोडपले! पेरणी दडपण्याची भीती
By Admin | Updated: July 23, 2014 23:21 IST2014-07-23T23:21:42+5:302014-07-23T23:21:42+5:30
चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सोमवारपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप बुधवारच्या सायंकाळपर्यंत अखंड सुरूच होती. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली.

पावसाने झोडपले! पेरणी दडपण्याची भीती
भिंत कोसळून चार जणांचा मृत्यू : झाडे उन्मळली, शेतीची हानी, वाहतूक विस्कळीत, घरे कोसळली
लोकमत चमू - अमरावती
चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सोमवारपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप बुधवारच्या सायंकाळपर्यंत अखंड सुरूच होती. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. संततधार पावसामुळे चांदूररेल्वे व अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात घरांच्या भिंती कोसळून दाम्पत्यासह दोघांचा मृत्यू झाला. तर पावसाच्या तडाख्याने चांदूररेल्वे तालुक्यातील मालखेड येथे १८ गायी मृत्युमुखी पडल्या. रेवसा येथे पेढी नदीच्या पुरात सुमो गाडीसह चालकही अडकून पडला होता. तर मुसळधार पावसामुळे उशिरा झालेली पेरणी दडपण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
चांदूररेल्वे तालुक्यातील बग्गी जावरा गावातील घराची भिंत कोसळल्याने त्याखाली दबून हरीभाऊ शेलोकार (६५) व मंदा हरिभाऊ शेलोकार (६०)या दाम्पत्याचा मृत्यू झाला. अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथेही घराची भिंत पडल्याने नुरजहां परवीन जलीलशहा (३०) महिला मृत्युमुखी पडली. तर तिचा मुलगा फैजनशहा जलीलशहा (८) गंभीर जखमी झाला. अंजनगाव सुर्जी तालक्यात सातेगाव येथे घराची भिंत कोसळून बाळू नारायण रोकडे (५८) यांचा मृत्यू झाला. चांदूररेल्वे तालुक्यातील पळसखेड येथे घराची भिंत कोसळून जया दीपक चावरे (२५) व छकुली नामक एक वर्षाची चिमुरडी गंंभीर जखमी झाली. भातकुली तालुक्यात धामोरी येथे भिंत कोसळून २ गाई दगावल्या. तालुक्यात ३० घरांची पडझड झाली असूून मौजा भातकुली येथे पुराचा वेढा पडल्याने जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
जिल्ह्यात सरासरी १४३ मिमी पाऊस
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्याभरात सरासरी १४३.०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून संततधार पावसाच्या सरी कोसळत असल्याने जीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याभरात प्रशासकीय यंत्रणेने नोंदविलेला दैनंदिन पर्जन्यमानानुसार जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस चिखलदरा तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस भातकुली तालुक्यात पडला. यावर्षीच्या मान्सून सत्रात १ जून ते २३ जुलै पर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५१.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जून ते सप्टेंबर या कालावधित पावसाची वार्षिक सरासरी टक्केवारी ८१४.५ मिमी अपेक्षित होती. मात्र या तुलनेत यावर्षी पावसाने ५० टक्केही हजेरी लावली नसल्याचे या आकडेवारी दिसून येते. जून महिना पूर्णत: कोरडा गेला तरी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वरूण राजाने जोरदार हजेरी लावली.